उद्यापासून 18 ते 45 वयोगटाचे लसीकरण : ’को विन’ पोर्टलवर नोंदणी करणाऱयांनाच लस : केंद्राने पाठविले 323 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स
प्रतिनिधी / पणजी
राज्याला काल गुरुवारी आणखी 32 हजार कोविड लसींचा साठा प्राप्त झाला असून उद्या दि. 15 मे पासून 18 ते 45 वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही लस सर्वांना मोफत देण्यात येणार आहे.
आरोग्य संचालक डॉ. ज्योस डिसा यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाकडून गुरुवारी हा 32 हजार लसींचा साठा गोव्यात दाखल झाला आहे. त्यानुसार सरकार योजनाबद्द आराखडा तयार करून उद्यापासून राज्यभरातील 35 लसीकरण केंद्रांमधून 18 ते 45 वयोगटातील लोकांना लस देण्यास प्रारंभ हेणार आहे.
आरोग्य खात्यातील अन्य एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 23 प्राथमिक आरोग्य केंद्र, सहा सामाजिक आरोग्य केंद्र, चार नागरी आरोग्य केंद्र, गोमेकॉ आणि मंडूर डोंगरी येथील ग्रामीण आरोग्य केंद्रांमधून हे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी खास तयार करण्यात आलेल्या ’को विन’ या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणाऱया वरील वयोगटातील लोकांचेच लसीकरण करण्यात येणार असल्याचे डॉ. डिसा यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्राकडून 323 कॉन्सन्ट्रेटर्स राज्यात दाखल
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱया लाटेचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून गोव्याला मोठी मदत मिळाली आहे. केंद्रीय रक्षा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पुढाकाराने 323 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि अन्य वैद्यकीय साहित्यासह भारतीय वायुसेनेची दोन विमाने गोव्यात दाखल झाली आहेत.
राज्यात ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे रोज पन्नास-पाऊणशे लोकांचे बळी जात आहेत. अशा परिस्थितीत आता केंद्राने राज्याला मोठा दिलासा दिला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे. ऑक्सिजन तुटवडय़ामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्राने हे कॉन्सन्ट्रेटर्स पाठवून मोठे उपकार केले आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना फायदा होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती आभार व्यक्त केले आहेत.
केंद्राकडून गोव्याला सर्वतोपरी मदत ः श्रीपाद नाईक
गोव्यासह कित्येक राज्यात ऑक्सिजन तुटवडय़ामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना मदतीचा हात देण्याचे प्रयत्न करत आहे. भारतीय सेनेनेही कोरोनाच्या या लढय़ात स्वतःला झोकून दिले आहे. त्यांचे मदतकार्य जोरात सुरू आहे. मित्र राष्ट्रांनी पुरविलेल्या ऑक्सिजनसह अन्य वैद्यकीय सामुग्री भारतात आणण्यात नौदल मोलाची कामगिरी बजावत आहे, असे मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे.









