तणाव कायम, भूसेनाप्रमुख नरवणे यांच्याकडून लडाख योद्धय़ांचा सन्मान,
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत आणि चीन यांच्यातील सचिव स्तरावरील चर्चा पार पडली आहे. लडाख येथे सीमेवरील तणाव दूर करण्याच्या हेतूने ही चर्चा आयोजित करण्यात आली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या चर्चेत विविध मुद्दय़ांवर दोन्ही देशांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्याचे समजते. मात्र, भारताने सीमेवरच्या प्रत्येक संघर्षबिंदूवर जोरदार सज्जता ठेवली आहे.
सीमेवरील तणाव कमी करण्यावर दोन्ही बाजूंमध्ये तत्वतः समंती झाली असली तरी चीनने अद्याप आपली प्रस्थापने मागे घेतलेली नाहीत. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून 5 किलोमीटर आत मागे हटावे अशी मारताची मागणी आहे. तथापि, चीनने गालवन खोरे, गोग्रा उष्णझरे आणि पँगाँग सरोवर या परिसरात त्याच्या भागात सैनिकांच्या तुकडय़ा नियुक्त केल्या आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही आपल्या सैनिक तुकडय़ा समोरच्याच भागात नियुक्त केल्या आहेत.
या भागांमध्ये भारताने मोठय़ा प्रमाणात सैन्य आणले आहे, असे येथील ग्रामस्थांनीही म्हटले आहे. चीनच्या कोणत्याही दुःसाहसाला हाणून पाडण्याइतकी शक्ती येथे भारताने एकवटली आहे, असे मत येथील एका नागरिकाने व्यक्त केले. सैन्याधिकाऱयांनीही तयारीसंबंधी समाधान व्यक्त केले.
लढाऊ विमानांची गस्त
लडाख भागातील संघर्षबिंदूंजवळ बुधवारी भारताच्या लढाऊ विमानांनी वायुकसरती केल्या. कोणत्याही स्थितीला तोंड देण्याची भारताची तयारी असल्याचे सांगण्यात आले. या वायुकसरती शक्तीप्रदर्शनाचा एक भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या सरावात मिराज, सुखोई, मिग 29, तेजस आणि जॅग्वार या लढाऊ विमानांनी भाग घेतला होता. साधारणतः 2 तास हा सराव चालला.
लडाख योद्धय़ांचा सन्मान
भारताचे भूसेनाप्रमुख मनोज नरवणे यांनी बुधवारी लडाखमध्ये चीनी हल्ला यशस्वीरित्या परतवून लावलेल्या सैनिकांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला लेह व लडाखमधील अनेक सेनाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे सीमेवर लढणाऱया सैनिकांचा आत्मविश्वास दुणावला आहे, असे अधिकाऱयांनी प्रतिपादन केले. भारताच्या सीमा पूर्णतः सुरक्षित असून कोणत्याही प्रकारची घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती सेनाधिकाऱयांनी याप्रसंगी केली.
अग्रस्थानांवरील चौक्यांची पाहणी
लडाख भागात भूसेनाप्रमुख नरवणे यांनी आघाडीवरील सैनिक चौक्यांना भेट देऊन त्यांची पाहणी केली. या चौक्यांवर चार हजार अतिरिक्त सैनिक नियुक्त करण्यात आले आहेत. शस्त्रसज्जतेतही भारताने चीनच्या तोडीस तोड तयारी केली आहे, असे सांगण्यात आले. गेल्या 50 वर्षांमध्ये अशा प्रकारची सेना सज्जता पाहण्यात आली नव्हती, अशीही प्रतिक्रिया काही तज्ञांनी व्यक्त केली आहे.
चीनी सैन्य मागे हटले ?
बुधवारी दुपारी काही टीव्ही चॅनेल्सवरून नव्या उपग्रहीय प्रतिमा प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार गालवन खोरे, गोर्गा उष्ण झऱयांचा प्रदेश तसेच पँगाँग सरोवर या प्रदेशातून चीनी सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून म्तीन ते पाच किलोमीटर मागे हटल्याचा दावा करण्यात येत होत्या. तसेच भारताच्या भूमीवर चीनचा प्रवेश झालेला नसल्याचेही या छायाचित्रांवरून दिसून येत होते. मात्र चॅनेल्सवराच्या या कार्यक्रमांची स्वतंत्ररित्या पुष्टी होऊ शकलेली नाही. तसेच भारतीय सेनेकडूनही त्यासंबंधी काही वक्तव्य करण्यात आलेले नाही. कदाचित, येत्या एक दोन दिवसात चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत भारत चीनवर विश्वास ठेवणार नाही हेही स्पष्ट आहे.









