सांबा सेक्टरमध्ये 450 फूट लांबीचे भुयार मिळाले : बीएसएफ सतर्क
वृत्तसंस्था/ जम्मू
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये 450 फूट लांबीच्या एका भुयाराचा शोध लावला आहे. या भुयाराविषयी इनपूट मिळाला होता. शोधमोहिमेच्या दरम्यान हे भुयार दिसून आले आहे. झिरो लाइनपासून भारताच्या दिशेने असलेले हे भुयार 450 फूट लांबीचे आहे. याचे तोंड वाळूच्या पिशव्यांनी झाकण्यात आले होते अशी माहिती बीएसएफचे जम्मू रेंजचे आयजी एन.एस. जामवाल यांनी दिली आहे.
या प्रकरणी पाकिस्तानी अधिकाऱयांकडे तक्रार करत दोषींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी की जाणार आहे. वाळूने भरलेल्या पिशव्यांची स्थिती पाहता हे भुयार काही दिवसांपासून तयार केले जात असावे. सीमावर्ती भागात इतके मोठे भुयार पाकिस्तानी रेंजर्स आणि अन्य यंत्रणांच्या मंजुरीशिवाय निर्माण होऊ शकत नसल्याचे जामवाल म्हणाले आहेत.
3-4 फूट रुंद
भुयार 3-4 फूट रुंद आकाराचे आहे. तपासादरम्यान भुयारात 8 ते 10 प्लास्टिकच्या पिशव्या सापडल्या आहेत. या पिशव्यांवर पाकिस्तानातील कराची आणि शकरगढचा उल्लेख आहे. पिशव्यांवर त्याच्या निर्मितीची तारीख पाहता त्या अलिकडच्या काळातील आहेत. भुयार पाकिस्तानी चौकीपासून सुमारे 400 मीटरच्या अंतरावर असल्याचे बीएसएफकडून सांगण्यात आले आहे.
शोधमोहीम सुरू
भुयाराचा शोध लागल्यावर बीएसएफने पूर्ण भागात शोधमोहीम हाती घेतली आहे. अशाप्रकारचे भुयार अन्य ठिकाणीही निर्माण करण्यात आल्याची शंका आहे. या भुयारांद्वारे घुसखोरांना भारतात प्रवेश मिळवून दिला जात असावा. शस्त्र तसेच अमली पदार्थांची तस्करीसाठीही याचा वापर केला जात असावा असे बीएसएफने म्हटले आहे.
5 घुसखोर ठार
पंजाबच्या तरन तारनमध्ये बीएसएफने मागील आठवडय़ात आंतरराष्ट्रीय सीमेवर 5 घुसखोरांना कंठस्नान घातले होते. या घुसखोरांकडून एके-47 रायफल आणि 4 पिस्टल आणि 9.5 किलो हेरॉइन मिळाले होते. चकमक तरन तारन जिल्हय़ात ढल चौकीनजीक झाली होती. या चकमकीनंतर बीएसएफने अत्यंत सतर्क राहत सीमेनजीक शोधमोहीम हाती घेतली होती.









