चीनचा बगलबच्चा समजला जाणारा पाकिस्तान एका संधीचीच वाट बघत आहे. भारताकरता रात्र वैऱयाची आहे आणि डोळय़ात तेल घालून काम केले नाही तर कधीही घात होऊ शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱया टर्मचे एक वर्ष नुकतेच पार पडले. जर स्थिती सामान्य असती तर मोदी सरकारचा हा सहावा वर्धापन दिन मोठय़ा धुमधडाक्मयाने पार पडला असता. एक वर्षांपूर्वी झालेल्या मोदींच्या नेत्रदीपक विजयाचा गवगवा साऱया जगभर झाला होता. पण आता मोदी 2.0 चा पहिला वाढदिवस साजरा झाला तेव्हा पंतप्रधानांना एकापेक्षा एक कठीण आव्हानांनी घेरले आहे असे चित्र दिसू लागले आहे. एकीकडे कोरोनाची महामारी झेलत असताना टाळेबंदीतून देशाला कसे बाहेर काढायचे आणि ते करत असताना या विषाणूला आळा कसा घालायचा हा तिढा सोडवताना त्यांची कसोटी लागत आहे. दुसरीकडे मंदीचा मार झेलत अर्धमेली झालेली अर्थव्यवस्था टाळेबंदीने आचके देऊ लागली आहे तर तिसरीकडे एक प्रचंड संकट दत्त म्हणून उभे ठाकले आहे. देशाच्या सीमा अचानक तापू लागल्या आहेत. काल परवापर्यंत शांत असलेली चीनबरोबरील सीमा अचानक चिंतेची बाब होऊन बसलेली आहे. ड्रगन कशामुळे चवताळला आहे ते कळायला मार्ग नाही. पण बीजिंगच्या या तिरक्मया चालीने नवी दिल्लीत एक अस्वस्थ वातावरण आहे. चीनला कसा आवर घालवायचा याची उच्च वर्तुळात खलबते सुरू आहेत. चीनला जागतिक पातळीवर नेतृत्वाची जबर घाई शी जिनपिंग यांच्या अधिपत्याखाली झालेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून भारताला शह देण्याचा हा कार्यक्रम सुरू आहे असे काही जाणकार मानतात. पाकिस्तान हा चीनचा मांडलिक देश आहे तर आशिया खंडाच्या राजकारणात भारत त्याला पहिल्यापासून प्रतिस्पर्धी वाटला आहे. ‘भारताबरोबरील वाद आम्ही परस्पर वाटाघाटीने सोडवू’ अशी टकळी एकीकडे चालू ठेवत दुसरीकडे लडाखच्या दुर्गम सीमावर्तीय इलाक्मयात हळूहळू आपले सैन्य घुसवण्याचा कुटिल डाव चीन खेळत आहे. ही घुसखोरी बऱयाच ठिकाणावरून सुरू असल्यामुळे चीनच्या सर्वोच्च नेतृत्वाने हिरवा कंदील दिला असल्याशिवाय हे शक्मय नाही असे चीन अभ्यासकांना वाटते. गेल्या ऑगस्ट महिन्यात भारताने जम्मू आणि कश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात रूपांतर केले तेव्हाच चीन आज ना उद्या याबाबत वाकडे लावणार हे ठरलेले होते असे हे अभ्यासक म्हणतात. संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी दिलेल्या संकेतानुसार चीनची सध्याची घुसखोरी ही नेहमीच्या प्रकारची नाही. जुजबी नाही. ‘पाकिस्तानने चीनला आंदण दिलेला आक्क्सई चीन भाग हा भारताचा आहे आणि तो भारत परत मिळवल्याशिवाय राहणार नाही’, अशा पद्धतीचे विधान सरकारने जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवले तेव्हा केले होते. त्याने चीन सावध झाला आणि हिमालयातील जबर हिवाळा संपल्यावर त्याने या घुसखोरीद्वारे आपले दात दाखवायला सुरुवात केलेली आहे असेही काही चीन अभ्यासक मानतात.
चीनने सुरु केलेली ही आगळीक किती गंभीर रूप धारण करते ते येत्या काही आठवडय़ात स्पष्ट होणार आहे. तीन वर्षापूर्वी डोकलाम या भूतानलगतच्या परिसरात भारतीय आणि चीन फौज तब्बल 72 दिवस समोरासमोर उभ्या ठाकल्या होत्या. चीनच्या ग्लोबल टाइम्स या वर्तमानपत्राने तर उलटय़ाच बोंबा मारल्या आहेत. भारतानेच गाल्वान नदी परिसरातील चीनच्या भूभागात घुसखोरी केलेली आहे असा जावईशोध लावून या वर्तमानपत्राने नवी दिल्लीला दमात उखडवण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने बऱया बोलाने माघार घेतली नाही तर डोकलामपेक्षा भयानक तणाव निर्माण होईल आणि त्याचा भारत चीन संबंधावर विपरीत परिणाम होईल अशी मल्लिनाथी त्याने केली आहे. 1962 च्या युद्धावेळी चीन आणि भारत यांचे सकल राष्ट्रीय उत्पन्न एक प्रकारे बरोबर होते तर आता चीनची अर्थव्यवस्था भारताच्या पाचपट झालेली आहे याचा देखील विसर पडू नये असा शहाजोग सल्ला देखील या चिनी वर्तमानपत्राने दिला आहे. चीनमध्ये हुकूमशाही आहे आणि सारी प्रसारमाध्यमे फक्त सरकारचीच बाजू मांडतात. चीनने भारताकडून होत असलेली डुकराच्या मांसाची निर्यात अचानक काहीही कारण न देता थांबवली आहे. भारताने सर्वच बाबतीत सबुरीचे धोरण घेतले नाही तर त्याला आघाडीवरदेखील बेजार केले जाईल असा हा अप्रत्यक्ष इशाराच आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनमधील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करायची तयारी दाखवली असली तरी त्याला चीनने जाहीरपणे वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. भारताने अप्रत्यक्षपणे आपल्याला कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही असे सूचित केले आहे. चीनबरोबर दोन हात करावयाचे झाले तर ते भारताला स्वबळावर करावे लागणार आहे आणि तिथे कोणीही त्याच्या मदतीस येणार नाही. राष्ट्रे आपले हितसंबंध जपत असतात आणि दुसऱयाची लढाई कोणी आपल्या अंगावर घेत नसतो. ट्रम्प यांना मध्यस्थी करून स्वतःचे महत्त्व वाढवायचे आहे असे आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचा एक गट मानतो. कोरोनाच्या अफाट प्रसाराच्या मुद्यावर ट्रम्प यांनी चीनविरोधी अगोदरच आघाडी उघडली आहे. चीन आणि अमेरिकेत आता जोरदार शीतयुद्ध सुरू होणार असे मानले जाते.
नेपाळने देखील नवीन सीमावाद निर्माण करून भारताला अडचणीत आणण्याचे धोरण अंगिकारले आहे. नेपाळमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आल्यापासून त्या देशाचा चीनधार्जिणेपणा वाढला आहे. जगातील एकमेव हिंदू राष्ट्र असलेल्या नेपाळशी परत गट्टी कशी जमेल याचा प्रयत्न भारताने केला पाहिजे असे आवाहन भाजपमधील एक गट करत आहे. पुलवामासारखा भयानक स्फोट घडवून आणण्याचा पाकिस्तानच्या इशाऱयावर चालणाऱया दहशतवाद्यांनी गेल्या आठवडय़ात जम्मू आणि काश्मीरमध्ये कट केला होता. तो यशस्वी झाला नसला तरी पाकिस्तान किती घायकुतीला आलेला आहे हे त्यावरून दिसून आले. चीनचा बगलबच्चा समजला जाणारा पाकिस्तान एका संधीचीच वाट बघत आहे. तात्पर्य काय तर भारताकरता रात्र वैऱयाची आहे आणि डोळय़ात तेल घालून काम केले नाही तर कधीही घात होऊ शकतो.
सुनील गाताडे








