प्रतिनिधी/ धारबांदोडा
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काल मंगळवार 1 सप्टें.पासून गोवा राज्याच्या सर्व सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत. या दिवशी मोले चेक नाक्यावर वाहनांची वर्दळ दिसून आली नाही. गेल्या दिड वर्षापासून अनमोड ते पुढेपर्यंत महामार्ग रस्ता बांधण्याचे काम हातात घेतल्याने या मार्गावर वाहतूक करणे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मोजकीच वाहने दिसून आली.
गोव्याची मोले ही महत्त्वाची सीमा आहे. अनलॉक 4 च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आंतरराज्य बस वाहतुक सुरु करण्यात आली आहे. मात्र मोले ते अनमोड घाट वाहतूक बंद असल्याने एकही प्रवासी बस वाहतूक करू शकलेली नाही. खासगी वाहने सध्या या मार्गावरून ये-जा करीत आहेत. लॉकडाऊनच्या काळात या मार्गावरून अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अवजड व लहान वाहनांची ये-जा सुरु होती.
दरम्यान, गटप्रभा येथे कर्नाटक हेल्थ इंस्टीटय़ुटमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेणाऱया अंतिम वर्षातील 23 विद्यार्थ्यांना परीक्षा संपल्यानंतर मंगळवारी मोले चेक नाक्यावर संस्थेच्या बसने सोडण्यात आले तर चौथ्या वर्षात शिकणाऱया 22 गोव्यातील विद्यार्थ्यांना घेऊन सदर बस गटप्रभाकडे रवाना झाली.
मंगळवारी गोव्यातील विद्यार्थ्यांना मोले चेक नाक्यावर आणून सोडणार असल्याने व काही विद्यार्थी निघणार असल्याने चेक नाक्याजवळ पालकांची व विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. दरम्यान, अनलॉक 4 घोषित झाल्याने धारबांदोडा तालुक्यातील बहुतेक बार ऍण्ड रेस्टॉरंट खुली झाली आहेत. शिवाय बाजाराच्या ठिकाणी लोकांची वर्दळही दिसून आली.









