पाकिस्तानी सैन्याला तालिबानची धमकी
वृत्तसंस्था/ काबूल
पाकिस्तानी सैन्य आणि तालिबान यांच्यादरम्यान अफगाणिस्तान-पाकिस्तानला वेगळे करणाऱया डूरंड रेषेवरून वाद चिघळला आहे. डूरंड रेषेवर कुंपण उभारणाऱया पाकिस्तानी सैन्याला तालिबानने युद्धाची धमकी दिली आहे. आम्ही ज्यूंपेक्षा पाकिस्तानी सैन्याशी युद्ध करणे पसंत करू असे म्हणत तालिबानने डूरंड रेषेवर उभारण्यात आलेले तारांचे कुंपण उद्ध्वस्त केले आहे.
तालिबानच्या स्पेशल फोर्सचे नेतृत्व पूर्व नांगरहार प्रांताचे गुप्तचर प्रमुख डॉक्टर बशीर यांनी केले. पाकिस्तानी सैनिक अफगाण भूमीत कुंपण उभारत असल्याचे तालिबानकडून सांगण्यात आले. डूरंड रेषेवर उपस्थित असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना बशीर यांनी धमकाविले आहे. पाकिस्तानी सैनिकांनी सीमा ओलांडल्यास आमच्यासोबत युद्धासाठी तयार रहावे. आम्ही ज्यूंपेक्षा तुमच्यासोबत युद्ध करणे पसंत करू असे बशीर यांनी म्हटल्याचे एका चित्रफितीत दिसून येते.
डूरंड रेषेला विरोध
डूरंड रेषेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यादरम्यानची सीमा म्हटले जाते. अफगाणिस्तानमधील पूर्वीचे सरकार आणि तालिबान राजवट देखील या डूरंड रेषेला विरोध करत आहे. डूरंड रेषा मान्य करत नसल्याचे तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनीच म्हटले आहे. अफगाणिस्तानमधील बहुसंख्याक पश्तून आणि तालिबानने डूरंड रेषेला कधीच अधिकृत सीमारेषा मानलेले नाही.
ब्रिटिश-सोव्हियत संघाचा ग्रेट गेम
डूरंड रेषा हा रशियन आणि ब्रिटिश साम्राज्यांमधील 19 व्या शतकाच्या गेट गेमचा एक वारसा आहे. तेव्हा पूर्वेत रशियाच्या विस्तारवादापासून वाचण्यासाठी ब्रिटिश साम्राज्याने अफगाणिस्तानचा बफर झोन म्हणून वापर केला होता. 12 नोव्हेंबर 1893 मध्ये ब्रिटिश सिव्हिल सर्व्हेंट सर हेन्री मोर्टिमर डूरंड आणि तत्कालीन अफगाण राज्यकर्ते अमीर अब्दुर रहमान यांच्यात डूरंड रेषेच्या स्वरुपात प्रसिद्ध करार झाला होता.









