अहमदाबाद
गुजरातमध्ये 2001 ला झालेल्या भूकंपानंतर कच्छच्या भुज सीमाशुल्क विभागाने जामनगर येथील सीमाशुल्क विभागाच्या कार्यालयात ठेवलेले 1 कोटी 10 लाख रुपयांचे सोने गहाळ झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी सीमाशुल्क विभागाच्या अज्ञात कर्मचाऱयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, 2001 मध्ये कच्छच्या भुज सीमाशुल्क विभागाने भूकंपात इमारत कोसळल्यानंतर तब्बल 3,149.398 ग्रॅम सोने जप्त करत जामनगर सीमाशुल्क विभागाकडे दिले होते. आता भुज कार्यालयाचे अधिकारी सोने ताब्यात घेण्यासाठी गेले असता 1 कोटी 10 लाख रुपयांचे सोने गायब झाल्याचे आढळून आले. यानंतर अंतर्गत तपासणीसाठी विभागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.









