मूक सायकल फेरीने निषेध : फेरीनंतर मराठा मंदिर येथे होणार सभा
प्रतिनिधी /बेळगाव
सीमावासियांवर होणाऱया अन्यायाविरोधात मंगळवार दि. 1 नोव्हेंबर रोजी मूक सायकलफेरी काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. बेळगावसह खानापूर, निपाणी या परिसरात कडकडीत हरताळ पाळून सीमावासीय आपला विरोध दर्शविणार आहेत. मूक सायकलफेरीसह सभेला महाराष्ट्रातील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. यामुळे मंगळवारी पुन्हा एकदा सीमावासियांचा एल्गार दिसणार आहे.
मंगळवार दि. 1 रोजी सकाळी 9 वा. महाद्वार रोड येथील संभाजी उद्यान येथून सायकलफेरीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पारंपरिक मार्गाने शहर व शहापूर भागात सायकलफेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर रेल्वे ओव्हरब्रिजजवळील मराठा मंदिर येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कोल्हापूर येथील सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह अनेकांना आमंत्रण दिले आहे. त्यामुळे कोणते नेते उपस्थित राहणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
मागील दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे मूक सायकलफेरीला परवानगी मिळाली नव्हती. परंतु यावषी मोठय़ा प्रमाणात काळा दिन पाळण्यासाठी म. ए. समितीकडून तयारी करण्यात आली आहे. केवळ बेळगावच नाही तर खानापूर व निपाणी येथेही निदर्शने करण्यात येणार आहेत. सायकलफेरी व सभेला सीमावासियांनी एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन मध्यवर्ती म. ए. समिती बरोबरच, शहर म. ए. समिती, तालुका म. ए. समिती, म. ए. समिती महिला आघाडी, युवा समिती, युवा आघाडी, खानापूर म. ए. समिती, निपाणी म. ए. समितीतर्फे करण्यात आले
आहे.
हरताळ पाळण्याचे आवाहन
मागील 66 वर्षांपासून सीमाभागात काळय़ादिनी कडकडीत हरताळ पाळला जातो. सीमावासीय आपले सर्व व्यवहार बंद ठेवून काळय़ा दिनाच्या सायकलफेरीत सहभागी होतात. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या लढय़ासाठी आजही आम्ही तत्पर आहोत याचे दर्शन घडविले जाते. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काळी वस्त्रे, काळय़ा फिती, काळे फलक, टोप्या घालून मोठय़ा संख्येने सायकलफेरीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आमदार आबिटकर, आबासाहेब पाटील यांची उपस्थिती

कोल्हापूर जिल्हय़ातील राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांची मंगळवारी होणाऱया सभेला उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी देखील आपण काळय़ा दिनाच्या सायकल फेरीमध्ये सहभागी होणार असल्याचा क्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला आहे. त्यामुळे या दोन नेत्यांसोबतच कोल्हापूर जिल्हय़ातील इतर नेतेही सहभागी होण्याची चिन्हे आहेत.









