भारताच्या तिहेरी दबावाचा परिणाम, अजित डोभाल यांची चिनी उच्चाधिकाऱयांशी चर्चा, भारताची सावध भूमिका कायम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेले दोन महिने भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमारेषेवर निर्माण झालेला संघर्ष आता निवळण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. गलवान खोऱयातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून चीनने त्याचे सैनिक 2 ते 3 किलोमीटर मागे हटविले आहेत. गोग्रा आणि उष्ण झऱयांच्या भागातील सीमारेषेवरूनही चीनची माघार सुरू झाल्याचे वृत्त आहे. त्याचप्रमाणे चीनच्या डोळय़ाला डोळा भिडवून सीमेवर उभ्या असणाऱया भारतीय सैनिकांच्या तुकडय़ाही काहीशा मागे गेल्याचे सांगण्यात येत आहे. भारताने मात्र, प्रत्यक्ष पडताळणी केल्याशिवाय चीनच्या माघारीला दुजोरा देणार नाही, असा सावध आणि सजग पवित्रा घेतला आहे.
चीनने अतिक्रमणाचा प्रयत्न केल्यानंतर भारताने त्याला कडवा विरोध केला होता. हा विरोध करत असतानाच 15 जूनच्या मध्यरात्री भारताच्या 20 सैनिकांना वीरमरण आले होते. तथापि त्यांनी चीनचेही 40 हून अधिक सैनिक ठार केले होते. चीनने अद्याप त्याच्या हानीची माहिती गुप्तच ठेवली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी चीनवर तिहेरी दबाव आणला होता. भारताने चीनच्या 59 ऍप्सवर बंदी आणून आर्थिक तडाखा दिला. तसेच रेल्वे आणि महामार्गांची कंत्राटेही चीनी कंपन्यांना न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर सीमेवर भारतानेही चीनच्या तोडीस तोड सैन्य आणून जोरदार सज्जता केली होती. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही चीनविरोधात आघाडी उघण्यात आली होती. या तिन्ही दबावांचा योग्य परिणाम झाल्याचे सध्या दिसून येत आहे.
सकाळपासूनच हालचाली
सोमवारी सकाळपासूनच गलवान खोरे, पँगाँग सरोवर (गोर्गा) आणि उष्ण झऱयांच्या सीमाप्रदेशातून चीनने आपले तंबू व इतर साधने काढून घेण्यास प्रारंभ केला. चीनच्या चिलखती गाडय़ांनीही मागे हटण्यास सुरवात केली. चीनने साधारणतः 2 ते 3 किलोमीटर मागे हटण्याचे धोरण अनुसरल्याचे दिसून येत आहे. भारतीय सैनिकांनीही त्याचप्रमाणे सीमारेषेवरून मागे जाण्यास प्रारंभ केला आहे. तथापि, भारतच्या हालचाली अत्यंत सावधपणे होत आहेत.
डोभाल यांची चर्चा यशस्वी
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे उच्चाधिकारी वांग यी यांच्यात रविवारी रात्री उशिरा दूरध्वनीवरून जवळपास दोन तास चर्चा झाली. त्या चर्चेत सीमेवरील सर्व संघर्षबिंदूंवरील तणाव दूर करण्याची प्रक्रिया ठरविण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार सोमवारी सकाळपासून सीमेवर दोन्ही बाजूंकडून माघारीच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून आले.
चीनकडूनही दुजोरा
चीनने सीमेवरून माघार घेतल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला. भारताची 10 जून, 20 जून आणि नंतर दोनवेळा चर्चा केली. त्या चर्चेत ठरल्याप्रमाणे आम्ही कृती करत आहोत, असे अधिकृत वक्तव्य चीनच्या अधिकाऱयांनी सोमवारी दुपारी केले. त्यामुळे तणाव निवळत असल्याचे आता मानले जात आहे.
गलवान विभाग मोकळा
चीनी सेनेने सीमेवरील सर्व तंबू काढून घेतले आहेत. तसेच अन्य बांधकामेही हटवून हा भाग मोकळा केल्याचे समजते. इतर दोन स्थानांवरही अशाच हालचाली दिसत आहेत. भारतीय सेनेच्या काही अधिकाऱयांनी काही स्थानी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना रचना हटविल्याचे दिसून आले. यासंबंधीचा सविस्तर अहवाल मंगळवारीच दिला जाणार आहे. पण काहीना काही हालचाली सुरू आहेत, अशी माहिती भारतीय अधिकाऱयांनी दिली आहे.
किती अंतर मागे
सध्या चिनी सैनिक काही ठिकाणी 2 तर काही ठिकाणी 3 किलोमीटर मागे गेले आहेत. मात्र नेमके ते किती मागे जातील आणि येत्या काही दिवसांमध्ये स्थिती कशी असेल याविषयी आताच काही सांगता येणार नाही. मात्र भारतची सेना सावध असून कोणताही धोका निर्माण झाल्यास पुन्हा चढाई केली जाईल, असे भारतीय अधिकाऱयांचे म्हणणे आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
देपसांगचा तिढा
देपसांग भागातही चिनी सैनिक नियंत्रण रेषेपर्यंत आले आहेत. तेथून ते अद्याप पूर्वीच्या स्थितीत मागे गेलेले नाहीत. भारताने यासंबंधी आग्रही भूमिका घेतली असून त्यासंबंधी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही सांगण्यात आले. एकंदर, तणाव निवळत असला तरी प्रत्येक पाऊल सावधपणे आणि कोणत्याही परिणांना तोंड देण्यास सज्ज राहूनच टाकण्याचे भारताने ठरविले आहे.
पीपी 15 आणि पीपी 17 अ मोकळे
मुख्य संघर्ष पीपी 15 आणि पीपी 17 अ या बिंदूंवर होता. या बिंदूंपर्यंत भारताची टेहळणी होत आहे. मात्र गेला एक महिना चीनने या टेहळणीला अटकाव करण्याचा प्रयत्न चालवला होता. भारतीय सैनिकांना गस्त घालता येऊ नये म्हणून चीनने या भागात काही तात्पुरती बांधकामे केली होती. आता ती हटविण्यात आली आहेत, असे भारतीय अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. हे दोन्ही बिंदू गोग्रा या अतिसंवेदनशील भागांमध्ये आहेत.
मोदींची लडाख भेट निर्णायक
गेल्या शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी अचानक लेह-लडाखचा दौरा केला. त्यांनी 15 जूनच्या संघर्षात जखमी झालेल्या सैनिकांची भेट घेतली. सीमेवरील परिस्थिती तेथील अधिकाऱयांकडून प्रत्यक्ष जाणून घेतली. ‘विस्तारवादाचे दिवस आता संपले आहेत. भारत कोणत्याही परिस्थितीत आपल्या सीमांचे संरक्षण करण्यास सिद्ध आणि समर्थ आहे. भारतमातेकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केल्यास त्याला धडा शिकविला जाईल,’ अशा कठोर शब्दांमध्ये चीनला इशारा दिला. त्यानंतर तीन दिवसांमध्येच चीनने नरमाईची भूमिका घेतली आहे.
पहिली फेरी भारताने जिंकली...
भारत आणि चीन यांच्यातील लडाखच्या संघर्षाची पहिली फेरी भारताने जिंकली आहे, अशी निःसंदिग्ध प्रतिक्रिया निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केली आहे. चीनने भारतावर मानसिक आणि सामरिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. 15 जूनला भारतीय सैनिकांवर हल्ला करून रक्तपात केला. पण भारतानेही चीनचे 54 सैनिक ठार करून आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवून दिली. या घटनेनंतर उलट चीनवरच अत्याधिक दबाव आला आणि त्याला माघार घेणे भाग पडले. सध्या चीन गालवन, गोग्रा आणि उष्ण झऱयांच्या प्रदेशातून मागे गेला आहे. चौथ्या स्थानी सीमारेषेवरूनही तो मागे जाईल अशी अपेक्षा आहे. मात्र चीन हा घातक देश असल्याने त्याच्यावर विश्वास टाकता कामा नये. सेनेने सदैव सावध असावे. पंतप्रधान मोदी यांच्या लडाख भेटीनेही चीनला योग्य संदेश मिळाला. अशा प्रकारे भारताने आपला उद्देश अधिकतर प्रमाणात साध्य केला आहे. चीनवरचा आर्थिक दबाव यापुढेही राखला पाहिजे, असेही प्रतिपादन महाजन यांनी केले.
काँगेसचे तुणतुणे कायम
चीनी सेना सीमेवरून मागे गेली याचाच अर्थ ते भारताच्या प्रदेशात घुसले होते, असे अजब तर्कशास्त्र काँगेसने पुन्हा मांडले आहे. चीननेही त्याच्या वक्तव्यात आपली सेना सीमेवरून मागे आणल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ सीमारेषा ओलांडली नव्हती असे चीननेही मान्य केले आहे, असे तज्ञांचे मत आहे. तरीही काँगेसने आपला हेका सुरूच ठेवला आहे. पंतप्रधान मोदींनी जनतेची क्षमा मागावी, अशी नवी मागणी या पक्षाने केली. काँगेसचा तोल सुटला आहे. भारताच्या सैन्याने चीनला सीमारेषेवरूनच मागे हटविले ही बाब काँगेसच्या पचनी पडत नाही. काँगेसने सातत्याने सैनिकांच्या पराक्रमाचा अपमान केला आहे. काँगेस या संघर्षाचे राजकारण करीत आहे, असा घणाघाती हल्ला भाजपनेही चढविला आहे.
तणाव निवळण्याच्या मार्गावर…
ड चीन सैनिकांच्या माघारीमुळे तणाव सैल होण्याच्या मार्गावर
ड भारताचा सामरिक, आर्थिक आणि राजनैतिक दबाव यशस्वी
ड चिनी सैनिकांकडून तंबू आणि बांधकामे हटविण्याची कृती
ड भारत मात्र अतिसावध, पडताळणीनंतरच दुजोरा दिला जाणार
ड सैनिक हटविण्याच्या वृत्ताला चीनच्या अधिकाऱयांचाही दुजोरा









