सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे प्रतिपादन : आयएनएस हिमगिरि युद्धनौका भारतीय नौदलात सामील
वृत्तसंस्था/ कोलकाता
भारतीय सशस्त्र दले कुठल्याही स्थितीला सामोरी जाण्यास पूर्णपणे तयार आहेत. देशाच्या सीमांच्या रक्षणाकरता सशस्त्र दलांनी स्वतःला झोकून दिलयाचे उद्गार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी सोमवारी काढले आहेत. कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (जीआरएसई) यार्डवर प्रकल्प-17 अंतर्गत निर्माण करण्यात आलेली ‘आयएनएस हिमगिरी’ या फ्रिगेट युद्धनौकेच्या सादरीकरणावेळी ते बोलत होते.
कोरोना संकटादरम्यान चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या उत्तर-पूर्व सीमेवर जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. याचमुळे भारतीय सैन्याला पूर्ण तयारीसह अतिदक्ष राहणे आवश्यक ठरले होते. आमची सशस्त्र दले देशाची सुरक्षा भूमी, आकाश आणि पाणी या सर्वच ठिकाणी करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचा विश्वास आहे, असे उद्गार रावत यांनी काढले आहेत.
आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल
केंद्र सरकार स्वतःच्या धोरणाद्वारे मेक इन इंडियाला चालना देण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. आत्मनिर्भर भारत या दृष्टीकोनाच्या अंतर्गत मोठय़ा संख्येत संरक्षण कंत्राटे भारतीय कंपन्यांकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न असून यामुळे देशात रोजगाराच्या संधीही वाढणार असल्याचे रावत म्हणाले. संरक्षण दलांच्या गरजा पूर्ण करताना आता स्वदेशी कंपन्यांना प्राधान्य देण्यात येत आहे.
प्रकल्प 17-ए
या प्रकल्पाच्या अंतर्गत निर्माण होणाऱया फ्रिगेट युद्धनौकेचा शत्रूच्या रडारला थांगपत्ता लावता येणार नाही. जीआरएसईच्या या प्रकल्पामुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात मोठी भर पडणार आहे. सोमवारी पहिली युद्धनौका सीडीएस रावत यांच्या हस्ते भारताला समर्पित करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत 3 युद्धनौका तयार करण्यात येणार आहेत. दुसरी आणि तिसरी युद्धनौका अनुक्रमे 2024 आणि 2025 मध्ये प्राप्त होणार आहे.
शस्त्रसंधी उल्लंघन चिंतेची बाब
पाकिस्तानकडून वारंवार होणारे शस्त्रसंधी उल्लंघन आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे. संरक्षण यंत्रणेला आता वॉरफायटिंग टेक्नॉलॉजीच्या भविष्याविषयी विचार करण्याची वेळ आल्याचे रावत यांनी म्हटले आहे.









