प्रतिनिधी / बेळगाव :
सीमाभागातील मराठी साहित्य संमेलनांवर दडपशाही करण्याचे कारस्थान कर्नाटकी पोलीस यंत्रणा करीत आहे. या दडपशाहीचा निषेध अ. भा. मराठी साहित्य संमेलनामध्ये व्हावा, अशी मागणी बेळगावातून संमेलनासाठी उपस्थित राहिलेल्या येथील सार्वजनिक वाचनालयाच्या पदाधिकाऱयांनी केली आहे.
उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनामध्ये सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष माजी महापौर गोविंद राऊत यांच्यासह पदाधिकारी कृष्णा शहापूरकर, नेताजी जाधव, अनंत जांगळे, ऍड. नागेश सातेरी, अनंत जाधव आदी सदस्य सहभागी झाले आहेत. त्यांनी अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची भेट घेतली. तसेच सीमाभागात मराठी बांधवांवर होत असणाऱया अन्यायाबद्दल माहिती दिली. सीमाभागात मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे कार्य या संमेलनांमधून होत आहे. मात्र, या संमेलनाच्या आयोजकांवर दडपशाही करून संमेलनांना परवानगी नाकारली जात आहे. या मुस्कटदाबीचा निषेध महाराष्ट्रात होणे गरजेचे आहे. तसेच अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील ठरावांच्या यादीत हा निषेधाचा ठराव मंजूर करावा, अशी मागणी या सदस्यांनी केली. यावेळी कौतिकराव ठाले-पाटील यांनी याबाबत विचार करण्याची ग्वाही दिली.









