माजी आमदार दिगंबर पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती : 24 ते 29 ऑक्टोबर दरम्यान खानापूर तालुक्यातील जनतेमध्ये जागृती करणार
प्रतिनिधी /खानापूर
गेली कित्येक वर्षे अनिर्णित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा, यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढलेल्या तोडग्याचा विचार करून त्याआधारे प्रश्नाची सोडवणूक करून घेणे हाच एक सद्यस्थितीत पर्याय आहे. याकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार दि. 30 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथील दसरा चौकात सकाळी 10 ते 4 यावेळेत खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने धरणे आंदोलन हाती घेण्यात आल्याची माहिती तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांनी शिवस्मारकात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, महाराष्ट्र, कर्नाटक सीमाप्रश्न सुटावा यासाठी गेल्या 65 वर्षांत अनेक प्रकारचे लढे देण्यात आले. या काळात माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, कै. शंकरराव चव्हाण, माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी सीमाप्रश्न सोडविण्यासंदर्भात वेगवेगळे पर्याय सुचविलेले होते. मात्र या सर्व पर्यायात 1993 साली तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना एक तोडगा काढला होता. त्यामध्ये तडजोड करून सीमाप्रश्न निकालात काढला जाणार होता. मात्र या प्रस्तावाला काही नेत्यांनी विरोध केल्याने हा प्रस्ताव मागे पडला. पण आजही सीमाभागातील परिस्थिती पाहता शरद पवार यांनी 1993 साली सुचविलेल्या प्रस्तावाचा पुनर्विचार करून सीमाप्रश्न कायमस्वरुपी निकालात काढावा. अन्यथा गेली 65 वर्षे चाललेला हा लढा ज्यामध्ये अनेकांनी हौतात्म्य पत्करले, हालअपेष्टा सोसल्या, अत्याचार सहन केले, लोकशाहीमार्गाने विविध लढेही दिले, हे सर्व वाया जाणार, अशी भीती वाटत आहे. जर तसे झाल्यास येणारी पिढी आपल्याला कदापिही माफ करणार नाही. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व नेतेमंडळींनी याबाबत ठोस भूमिका घेऊन शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच केंद्रीय नेतृत्वाकडे या तोडग्याबाबत पाठपुरावा करून सीमाप्रश्नाची सोडवणूक करावी, अशी खानापूर तालुका म. ए. समितीने मागणी केली असून यासंदर्भात महाराष्ट्रातील नेतेमंडळीची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदने दिली आहेत. याकडे त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठीच कोल्हापूरला धरणे आंदोलन हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माहिती देताना कार्याध्यक्ष यशवंत बिरजे म्हणाले, या धरणे आंदोलनाच्या प्राथमिक तयारीसाठी दि. 23 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद बोलाविण्यात आली आहे. त्यानंतर 24 ते 29 ऑक्टोबर याकाळात खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांचे वर्चस्व असलेल्या गावांना भेट देऊन धरणे आंदोलनाची तसेच दि. 1 नोव्हेंबर काळय़ादिनाची जनतेमध्ये जागृती केली जाणार आहे. तसेच दि. 1 नोव्हेंबर काळादिन केवळ सीमाभागातच न पाळता महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींनी तसेच जनतेने हाताला काळय़ा फिती बांधून त्या ठिकाणीही पाळावा, असा ठराव बुधवारी झालेल्या खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत केल्याची माहिती त्यांनी दिली.
वास्तविक, खानापूर तालुका म. ए. समितीने सीमाप्रश्न सुटावा यासाठी माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी 1993 साली सुचवलेल्या तोडग्याच्या आधारे हा प्रश्न सोडवावा, अशी आग्रही मागणी केली आहे. असे असताना मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष खानापूर तालुका म. ए. समितीच्या तसेच समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांच्याविषयी जनतेमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. याबद्दल त्यांचा आम्ही समितीच्या बैठकीत तीव्र निषेध केला असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
यावेळी शहराध्यक्ष विवेक गिरी म्हणाले, या तोडग्यासंदर्भात महाराष्ट्रातील मंत्र्यांना तसेच खुद्द माजी कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. त्यावेळी शरद पवार यांनीदेखील येत्या एक-दोन वर्षांत सीमाप्रश्नाची सोडवणूक न झाल्यास पुढील दिवस कठीण असल्याची खंत व्यक्त केली. यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत हा प्रश्न सुटावा, या दृष्टीनेच खानापूर तालुका म. ए. समितीने निर्णायक पावले उचलली असल्याची माहिती त्यांनी दिली.
या पत्रकार परिषदेत प्रकाश चव्हाण, विठ्ठल गुरव यांनीही आपले मत व्यक्त केले. शेवटी सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी आभार मानले. या पत्रकार परिषदेला खानापूर तालुका म. ए. समितीच्या कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते.









