मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासदारांना आवाहन
प्रतिनिधी/ मुंबई
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सीमाबांधवांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे हे दाखवून देण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. या मागणीचा सर्व खासदारांनी एकत्रित पाठपुरावा करावा, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी राज्यातील सर्व खासदारांची सोमवारी बैठक घेतली. बैठकीत ठाकरे यांनी खासदारांना महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न पक्षीय चौकट ओलांडून केंद्र सरकारसमोर एकत्रितपणे मांडावेत. राज्याच्या विकासाशी संबंधित सर्वच मुद्यांवर महाराष्ट्राची एकजूट दाखवावी, असे आवाहन केले.
महाराष्ट्राचे प्रश्न संसदेत मांडताना विषयानुरूप टीम तयार करा. पक्षीय भेदाभेदाला थारा देऊ नका. ज्यावेळी महाराष्ट्राशी संबंधित विषयांवर खासदार संसदेत विचार मांडत असतील, त्यावेळी आवर्जून उपस्थित रहा, असे ठाकरे म्हणाले. पुढील महिन्यात दिल्लीत खासदारांची बैठक घेऊन प्रश्न सुटले की नाही याचा आपण आढावा घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्याशी संबंधित विविध विषयांचा केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे. पीक विमा योजनेत सुधारणा करणे आवश्यक असून पूर आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी 15 हजार कोटी रुपयांपैकी 990 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. उर्वरित निधीसाठी खासदारांनी पाठपुरावा करावा, असे ठाकरे म्हणाले.
बैठकीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य जयंत पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, दादाजी भुसे, नवाब मलिक, अस्लम शेख, आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता तसेच विविध पक्षाचे खासदार आदी उपस्थित होते.
पाठपुराव्यासाठी खासदारांची समन्वय समिती
केंद्र सरकारशी संबंधित विविध विभागांकडे राज्यातील प्रलंबित प्रश्नांचा एकत्रित पाठपुरावा करण्यासाठी खासदारांची समिती गठीत करून तिच्या समन्वयपदी माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांची नेमणूक करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या समितीला दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ठाकरे यांनी जाहीर केले.









