खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांच्या भेटी घेण्यात आल्या. या दौऱयात सीमाभागाची कर्नाटकाच्या जोखडातून सुटका करण्यासाठी खासदार शरद पवार यांनी सूचविलेल्या तोडग्याचा पुन्हा एकदा विचार करण्याचा आग्रह नेतेमंडळीकडे केल्याची माहिती अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांनी दिली.
बुधवारी शिवस्मारक येथे म. ए. समितीची बैठक झाली. दौऱयाची कार्यकर्त्यांना माहिती देऊन या मागणीच्या पाठपुराव्याबाबत चर्चा केली. खानापूर समितीतर्फे कोल्हापूर, सांगली व कराडचा दौरा करून सीमालढय़ाला गती देण्याच्या मागणीकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सीमाप्रश्नाचा निकाल लागेपर्यंत हा भाग केंद्रशासित करावा, अन्यथा खासदार पवारांनी सूचविलेल्या तोडग्याची अंमलबजावणी करण्याचा महाराष्ट्राने विचार करावा, अशी मागणी केल्याची माहिती यशवंत बिरजे यांनी दिली. मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांच्या संपर्कात राहण्याचा निर्णय घेतला. सचिव आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला प्रकाश चव्हाण, भुविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, विवेक गिरी, महादेव घाडी, नारायण कापोलकर, विठ्ठल गुरव, जयराम देसाई, शिवाजी पाटील, डॉ. एल. एच. पाटील, कृष्णा मन्नोळकर, मऱयाप्पा पाटील, अमृत पाटील, अनिल पाटील, डी. एम. भोसले, रुक्माण्णा झुंजवाडकर आदी उपस्थित होते.









