प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी अंतर्गत मध्यवर्ती बसस्थानक आणि सीबीटी बसस्थानकाचा विकास साधण्यात येत आहे. मध्यवर्ती बसस्थानकाचे काम पूर्णत्वाकडे आले असले तरी सीबीटी बसस्थानकाचे काम अद्यापही बरेच शिल्लक आहे. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेले काम मध्यंतरी कोरोनामुळे बऱयाच काळासाठी रखडले होते. दरम्यान परराज्यातील कामगार आपल्या गावी गेल्याने काम सुरू करण्यास दिरंगाई झाली. सध्या सीबीटी बसस्थानक अर्ध्याभागाचे दुसऱया मजल्याचे काम सुरू आहे. तर अर्ध्याभागाचे अद्यापही तळमजल्याचे काम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन सुसज्ज बसस्थानक उभारण्यात येत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत तब्बल 31 कोटी रुपयांच्या निधीतून हा विकास साधण्यात येत आहे. याबरोबरच दोन्ही बसस्थानकात प्रवाशांना ये-जा करण्यासाठी भुयारी मार्गाची उभारणी केली आहे. त्यामुळे दोन्ही बसस्थानकात प्रवाशांना ये-जा करणे सोयिस्कर होणार आहे. सीबीटी बसस्थानकात तळमजल्यात पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. साधारण एक हजार ते दोन हजार दुचाकी गाडय़ांची पार्किंगची व्यवस्था होईल, अशी मोठय़ा जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बसस्थानकातील पार्किंगचा प्रश्न दूर होणार आहे. मात्र सध्या तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या बसस्थानकात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे.









