शिक्षण मंत्र्यांकडून घोषणा : जानेवारी किंवा फेब्रुवारीत परीक्षा नाही
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सीबीएसई बोर्ड परिक्षांसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासाजनक वृत्त आहे. किमान जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 मध्ये सीबीएसई बोर्ड परीक्षा होणार नाहीत. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी मंगळवारी यासंबंधी घोषणा केली आहे. सद्यस्थितीत जानेवारी आणि फेब्रुवारीत परीक्षा आयोजित करणे शक्य नाही. मार्चच्या तारखांसाठी स्थितीचे आकलन केले जात आहे, परीक्षांच्या तारखा लवकरच घोषित केल्या जातील असे निशंक म्हणाले.
देशभरातील शिक्षकांसोबत थेट संवाद करताना केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी ही घोषणा केली होती. विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्ड परिक्षांच्या तयारीसाठी पुरेसा वेळ दिला जाणार असल्याचे त्यांनी यापूर्वी म्हटले होते.
तयारीसाठी वेळ मिळणार
पालकांनी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा मे महिन्यात आयोजित करविण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नव्या पॅटर्नच्या आधारावर पुरेसा वेळ दिला जाणार आहे. मार्च महिन्यातच परीक्षा घ्याव्यात अशी अनिवार्यता नाही. कोरोनाची स्थिती पाहता परिक्षेचे वेळापत्रक निश्चित करण्यात येईल. 2021 च्या बोर्ड परिक्षेसाठी सीबीएसईने अभ्यासक्रम 30 टक्क्यांनी कमी केला आहे. गुणपत्रकावरून अनुत्तीर्ण हा शब्द हटविण्यात आला असल्याचे निशंक यांनी यापूर्वी सांगितले होते.
ऑफलाईनच होणार परीक्षा
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएसईची परीक्षा ऑनलाईन होणार नाही. 2021 मध्ये होणारी ही परीक्षा विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच द्यावी लागणार आहे. बोर्ड परिक्षांना ऑनलाईन करविण्याचा कुठलाच प्रस्ताव नाही. ही परीक्षा पूर्वीच्या वर्षांप्रमाणेच सामान्य लेखी स्वरुपात पार पडणार आहे. परंतु याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
ऑनलाईन वर्ग
सीबीएसई बोर्ड परिक्षांच्या आयोजनावरून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांदरम्यान विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. कोविडमुळे आतापर्यंत देशातील शाळा-महाविद्यालये पूर्णपणे सुरू झालेली नाहीत. बोर्ड परिक्षांच्या नोंदणीपासून वर्ग संचालनापर्यंत सर्व कार्ये आभासी किंवा ऑनलाईन पद्धतीने होत आहेत.
शिक्षकांचे मानले आभार
कोरोनाकाळात शिक्षकांनी योद्धय़ांप्रमाणे मुलांना शिकविले आहे. ऑनलाईन मार्गाने मुलांना शिकविण्यात शिक्षकांनी कुठलीच कमतरता ठेवली नाही. नव्या शिक्षण धोरणाच्या अंतर्गत शालेय शिक्षणात आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) विषय समाविष्ट केला जाणार आहे. शालेय स्तरावर एआयचे शिक्षण देणारा भारत जगातील पहिला देश ठरणार असल्याचे उद्गार निशंक यांनी काढले आहेत.









