ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देश सध्या कोरोना संकटाचा सामना करत आहे. या अशा परिस्थितीत शिक्षण विभागासमोर बोर्ड परीक्षा कशा घ्यायच्या असा प्रश्न उभा आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि बोर्डाच्या परीक्षांवर केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी आज देशातील विद्यार्थ्यांना संबोधित केले. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली होती.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले की, सीबीएसईने कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. बोर्डाने गुणपत्रिकेवरून ‘नापास’ हा शब्दही हटवला आहे. ऑनलाईन पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच भारताच्या नव्या शिक्षण पद्धतीची जगभरातून कौतुक केले जात आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
पुढे ते म्हणाले की, कोरोना संकटात सीबीएसईसह इतर बोर्डाच्या परीक्षाही कधी होणार, कशा घेतल्या जाणार, जेईई मेन्स आणि नीट यांसारख्या प्रवेश परीक्षांचं शेड्यूल कसं असणार, या सर्व प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांमध्ये अनेक शंका आहेत. आतापर्यंत सीबीएसई परीक्षा 2021 ची डेटशीट जारी करण्यात आलेली नाही. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आज विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत सर्व शंकांचे निरसन देखील केले.









