नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेची गुणपत्रिका तयार करण्यासाठी बनवलेल्या तेरा सदस्यीय समिती आज (१७जून) सुप्रीम कोर्टात आपला अहवाल सादर केला. सीबीएसईने सांगितलं की, अंतिम निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावी गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. सीबीएसईचे निकाल ३१ जुलै रोजी जाहीर होतील. ज्या विद्यार्थ्यांना निकालावर आक्षेप असेल त्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल, असं अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात सांगितलं.
यासाठी तीन प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. इयत्ता १०वी मध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर ३० टक्के मार्क देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर ३० टक्के गुण असतील ते ११ वीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित आणि उरलेले ४० टक्के गुण हे बारावी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि Prelim परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येतील.
कोरोना संसर्गामुळे सीबीएसई बारावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. निकाल बनवण्यासाठी 13 सदस्यीय समिती बनवण्यात आली होती. या समितीने निकालाचा फॉर्म्युला आज सुप्रीम कोर्टात सादर केला. तर बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर केले जातील, असं सरकारने कोर्टात सांगितलं.