परीक्षांसंबंधी केंद्र सरकारचा निर्णय- वाढत्या कोरोना संसर्गामुळे सावध पवित्रा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असून बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेऊन गुण दिले जातील. कामगिरीच्याआधारे दिलेल्या गुणांविषयी ज्यांना हरकत असेल त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र ही परीक्षा कधी होणार तसेच बारावीच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक यासंदर्भात 1 जून 2021 रोजी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.
वाढत्या कोरोना संकटामुळे केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबाबत बुधवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करण्याचा आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षणमंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव, सीबीएसई बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने बैठकीला उपस्थित होते. दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांच्यासह पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारकडे दोन्ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेत महत्त्वाचा निर्णय घेतला.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. त्यातही लहान मुलांनाही वेगाने संसर्ग होत असल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून केंद सरकारकडून विविध उपाययोजनांवर विचारविमर्ष सुरू आहे. सध्या देशात परिस्थिती गंभीर असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलावून त्यांची परीक्षा घेणे धोक्मयाचे ठरू शकते. यानिमित्ताने होणाऱया प्रवासात विद्यार्थ्यांना कोरोनाचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब विचारात घेऊन केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचाही निर्णय जाहीर केला.
बारावीच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करताना विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता वेळ मिळेल याची खबरदारी घेतली जाईल. परीक्षेच्या पहिल्या पेपरच्या किमान 15 दिवस आधी वेळापत्रक जाहीर करू; असे केंद्र सरकारने सांगितले. सीबीएसई बोर्डाचे अधिकारी 1 जून 2021 रोजी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतील, अशी माहिती केंद्र सरकारने दिली.
विद्यार्थी असमाधानी असल्यास प्रत्यक्ष परीक्षा देऊ शकणार
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एक महत्त्वाचा खुलासा करताना दहावीच्या विद्यार्थ्यांना इंटर्नल असेसमेंटनुसार गुण देऊन पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. तथापि, विद्यार्थी त्याबद्दल असमाधानी असल्यास तो पुढच्या वेळी परीक्षेस बसून अंतिम गुण मिळवू शकतात, असेही त्यांनी सांगितले. कोविड महामारी संपुष्टात आली किंवा आटोक्मयात आली की दहावीच्या परीक्षाही होऊ शकतात. त्यावेळी विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात. दहावीचा निकाल हा सीबीएससी बोर्डाने तयार केलेल्या निकषांनुसार योग्य वेळी जाहीर केला जाईल, असेही शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
बारावी विद्यार्थ्यांसाठी…
बारावीच्या नियोजित परीक्षा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. 1 जून रोजी उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल. त्यावेळची कोरोना संसर्गाची स्थिती पाहून पुढील निर्णय होईल. परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास त्यासंबंधी 15 दिवस आधीच विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येईल.
दहावी विद्यार्थ्यांसाठी…
सीबीएसई-दहावीची परीक्षा 4 मे ते 14 जूनपर्यंत होणार होती. ही परीक्षाच पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. बोर्डाकडून विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सच्या आधारावर गुण दिले जातील. कुणी विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर असमाधानी असल्यास ते नंतर पुन्हा परीक्षा देऊ शकतील.









