मुंबई/प्रतिनिधी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने शनिवारी सकाळीच छापा टाकला. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महाविकास आघाडीची बाजू नेहमी खंबीरपणे मांडणारे आणि प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली आहे.
“या गोष्टी देशभरात काही काळ थांबवायला हव्यात. किमान एक किंवा दोन महिने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांनी आपापलं राजकारण थांबवावं. कारण प्रत्येकाला आता कोविडशी लढण्याची गरज आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत. आज सामनाच्या अग्रलेखातून देखील देशातील करोनासंदर्भातल्या परिस्थितीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
उच्च न्यायालयाचे सीबीआयला आदेश…
दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी सीबीआयच्या कारवाईवर आपली भूमिका स्पष्ट केली. “सीबीआयला उच्च न्यायालयाने काही आदेश दिले आहेत. सीबीआय त्यानुसार काम करत असेल. यात राजकीय सूडबुद्धीचा प्रकार नसावा असं मी मानतो. पण जर तसं काही असेल, तर महाविकास आघाडीचं सरकार म्हणून आम्ही यासंदर्भात भूमिका घेऊ”, असं राऊत म्हणाले. “सीबीआयची टीम आहे. सीबीआयचा एक अजेंडा आहे. उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. मला वाटतं जी कारवाई सीबीआयने केली आहे, त्यावर आता कशाही प्रकारचं मत व्यक्त करणं चांगलं नाही. माझ्या मते अनिल देशमुख यांनी आपलं म्हणणं सीबीआयसमोर मांडलं आहे. सीबीआय आपलं काम करत आहे. उच्च न्यायालयाने आपलं काम केलं आहे. आणि महाविकासआघाडी देखील आपलं काम करत आहे”, असं ते म्हणाले.