तुलसी इमारतीसमोर आजपासून उभारणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या, हायरिस्क रूग्णांचा वाढता आकडा पाहता सीपीआर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनबेडची संख्या दोनशेवर नेण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक असलेला जंम्बो ऑक्सिजन टँक सोमवारी सीपीआर परिसरात दाखल झाला. हा टँक तुलसी बिल्डींगसमोर उभारला जाणार असल्याची माहिती सीपीआरच्या सुत्रांनी दिली.
जिल्हय़ात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 15 हजारांवर गेली आहे. कोरोना बळींची संख्या वाढत आहे. व्हेंटिलेटर अन् ऑक्सिजन बेडच्या कमतरतेमुळे यावर मर्यादा होत्या. दरम्यान जिल्हा प्रशासनाने सीपीआरमध्ये दोनशे ऑक्सिजनेटेड बेडची उभारणी केली आहे. त्यासाठी जंम्बो ऑक्सिजन टँकची आवश्यकता होती. हा टँक सोमवारी सायंकाळी सीपीआर परिसरात दाखल झाला. अधिष्ठाता कार्यालयासमोरील तुलसी बिल्डींगच्या परिसरात हा टँक उभारण्यासाठी काँक्रिटचा बेड तयार केला आहे. तेथे हा टँक ठेवला जाणार आहे. प्रत्यक्ष गुरूवारपासून जंम्बो ऑक्सिजन टँक सुरू होणार असल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आली.
सीपीआरमधील दुधगंगा इमारतीत सध्या 180 ऑक्सिजनेटेड बेड उभारणी सुरू आहे. यासह सीपीआरमधील 350 बेडसाठी या ऑक्सिजन टँकचा वापर होणार आहे. सध्या कोरोना रूग्णांसाठी 180 बेड ऑक्सिजनेटेड आहेत. त्यासाठी प्रारंभी याचा वापर होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.