जन्मतःच हृदयविकार, हृदयाला रक्तपुरवठा करणारी वाहिनी लहान असल्याने त्रास
प्रतिनिधी / कोल्हापूर
भादोले येथील राजवर्धन संदीप गायकवाड हा 7 वर्षाचा मुलगा.. जन्मतः त्याला हृदयविकार. त्यातून हृदयाचे ठोके वाढणे, धाप लागण्याचा त्रास होता. शालेय तपासणीत त्याच्या हृदयविकाराचे निदान झाले. त्यानंतर कोरोना आल्याने वर्षभर शस्त्रक्रिया रखडली होती, दरम्यानच्या काळात त्याचे शिधापत्रिकेवर नाव आले, अन् शुक्रवारी त्याच्या दबलेल्या, हृदयाच्या शिरेवर दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करण्यात आली. ती यशस्वी झाल्याची माहिती सीपीआरमधील कार्डियालॉजिस्ट, विभाग प्रमुख डॉ. अक्षय बाफना यांनी दिली.
हातकणंगले तालुक्यातील भादेले येथील शेतमजुराचे गायकवाड कुटुंब. संदीप गायकवाड यांच्या कुटुंबात आईवडील, पत्नी अन् 2 लहान मुले आहेत. त्यातील राजवर्धनला जन्मतःच हृदयविकार होता. डॉक्टरांनी तो 5 वर्षाचा झाल्यानंतर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. राजवर्धन 2019 मध्ये जिल्हा परिषद शाळेत पहिलीत होता, त्याचवेळी शालेय आरोग्य तपासणींअतर्गत त्याच्या हृदयविकाराचे निदान झाले. त्याच्या शस्त्रक्रियेची तयारी सुरू असताना त्याचे रेशनकार्डवर नाव नव्हते, त्यातून शस्त्रक्रिया रखडली. होती. त्यानंतर कोरोना साथीमुळे शस्त्रक्रिया वर्षभर पुढे गेली होती, अशी माहिती पालक संदीप गायकवाड यांनी दिली.
राजवर्धनला अचानक हृदयाचे ठोके कमी, जास्त होण्याचा त्रास होता. त्यामुळे त्याचे वजन कमी होत होते. कोरोना काळात पालकांनी त्याचे नाव दारिद्रÎरेषेखालील रेशनकार्डवर लावून घेतले. मंगळवारी तो सीपीआरमधील हृदय शस्त्रक्रिया विभागात दाखल झाला. शुक्रवारी त्याच्यावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या मांडीतून केबल हृदयानजीकच्या दबलेल्या, चोकअप झालेल्या शिरेपर्यत बलुन पोहोचवत ही शीर पुर्ववत कार्यक्षम केल्याची माहिती कार्डियालॉजिस्ट डॉ. अक्षय बाफना यांनी दिली.
राजवर्धनवरील शस्त्रक्रियेसाठी डॉ. वरूण देवकाते, टेक्निशियन देवेंद्र शिंदे, उदय बिरांजे, परिचारिका एम. डी. पाटील, विद्या गुरव, प्रसाद कोचरेकर, विनायक चौगुले, हेमंत मारूडा यांची मदत लाभली.
कॅथलॅब आल्यानंतरच शस्त्रक्रिया
राजवर्धनवर शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेला कॅथलॅब सीपीआरमध्ये नव्हता. डॉक्टरांनी तो गुरूवारी रात्री आपल्या मित्रांकडे संपर्क साधून मागवला. तो शुक्रवारी सकाळी मिळाला. तो सीपीआरमध्ये आल्यानंतर शुक्रवारी दुपारी या मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली.









