भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेची मागणी
वाकरे/प्रतिनिधी
लॉकडाउन काळात कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्यासाठी बंद करण्यात आलेल्या कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे
शासकीय रुग्णालयातील इतर रुग्णसेवा सुविधा त्वरित सुरू कराव्यात अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम पोवार (वाकरेकर) यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की सध्या कोरोना रुग्णांच्या उपचार सेवेमुळे कोल्हापूर जिल्हा रुग्णालय सीपीआरमधील इतर रुग्णसेवा खंडित झाली आहे.परंतु आता पाऊस सुरू झाल्यामुळे इतरही साथीचे रोग पसरू लागले आहेत. लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारी आणि उत्पन्न स्त्रोत थंडावल्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणे असह्य झाले आहे. त्यातच सीपीआरमधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर रुग्णसेवा बंद असल्यामुळे जनतेस खाजगी उपचार घेणे भाग पडत आहे. पण सध्याच्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेस ते कष्टदायी होत आहे. तरी सीपीआर हे गोरगरीब जनतेची जीवनदायीनी असून जनतेच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सीपीआरमधील रुग्णसेवा तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे संघटनेने जिल्हाधिकारी कोल्हापूर व अधिष्ठाता सीपीआर यांच्याकडे केली आहे.