प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर कोरोना हॉस्पिटलच्या आयसोलेटेड वॉर्डमध्ये शुक्रवारी गडहिंग्लज आणि हातकंणगले येथील दोन वृद्ध महिलांचा मृत्य़ू झाला. हातकणंगलेतील वृद्धेचा स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आहे. गडहिंग्लज येथील वृद्धेला जुना आजार होता, त्यामुळे तिचा स्वॅब घेतलेला नाही. अद्यापी एका मृत महिलेचा स्वॅब रिपोर्ट प्रलंबित आहे, अशी माहिती सीपीआरमधून देण्यात आली.
हातकणंगले तालुक्यातील 79 वर्षीय महिला 4 एप्रिलला सीपीआरमध्ये उपचारार्थ दाखल झाली. तिचा कोरोना वॉर्डमध्ये स्वॅब घेण्यात आला. तिला हृदयविकाराचा त्रास होता. तिचा शुक्रवारी पहाटे न्युमोनियाने मृत्यू झाला. तिचा कोरोना स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. गडहिंग्लज भागातील 77 वर्षीय महिला 11 एप्रिल रोजी उपचारार्थ दाखल झाली. तिला औषधाला दाद न देणारा क्षयरोग होता. तसेच तिला मधुमेह, दम्याचाही त्रास होता. त्यामुळे तिचा स्वॅब घेण्यात आलेला नाही. दरम्यान, एका मृत महिलेचा स्वॅब रिपोर्ट अद्यापी प्रलंबित असल्याची माहिती सीपीआर प्रशासनाने दिली.