`सीपीआर’च्या शस्त्रक्रिया विभागातील प्रकार
प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलच्या नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थिनी रविवारी ऑपरेशन थिएटरमध्ये काम करत होती. यावेळी एका परिचराने तिचा विनयभंग केला, या घटनेची माहिती तिने पालकांना दिली. सोमवारी पालक सीपीआरमध्ये आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पिडीतेच्या वैद्यकीय तपासणीनंतर तिचे समुपदेशन केले. दरम्यान, संशयित परिचराकडून हमीपत्र घेतल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये परिचर्या प्रशिक्षण केंद्र, महाविद्यालय आहे. तेथे एएनएम' वजीएनएम’ कोर्स आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत अभ्यासक्रम शिकवला जातो. येथील द्वितीय वर्षांतील एका विद्यार्थिनीची डÎुटी रविवारी रक्तपेढीशेजारील ऑपरेशन थिएटरमध्ये होती. सकाळी 10 च्या सुमारास तेथे परिचराकडून तिच्या विनयभंगाचा प्रकार घडला. त्यानंतर घाबरलेल्या विद्यार्थिनीने हा प्रकार पालकांना सांगितला. सोमवारी सकाळी तिचे पालक सीपीआरमध्ये आले. त्यांनी यासंदर्भात परिचर्या प्रशिक्षण केदांच्या प्राचार्यांकडे चौकशी केली. पालक मुलीसह सीपीआरमधील पोलीस चौकीत तक्रारीसाठी गेले, पण त्यांनी तक्रार दिली नसल्याचे समोर आले.
दरम्यान, पिडीत विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अपघात विभागात उपचार केल्यानंतर तिला नर्सिग कॉलेजमध्ये समुपदेशन करण्यात आले. तिच्या पालकांनी यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली नाही. दुपारी पिडीतेच्या पालकांसमोर संशयित परिचराकडून कबुलीनामा, हमीपत्र घेण्यात आल्याची माहिती नर्सिग कॉलेजच्या प्राचार्यांनी दिली.
नर्सिग कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून संशयिताला चोप
दरम्यान, संशयित परिचर विवाहित आहे. घटना उघडकीस आल्यानंतर परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी संशयिताला सीपीआर परिसरात चोप दिला. यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी घडलेली घटना गंभीर आहे. अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, संशयितांवर निश्चितच कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. दुपारी दोनच्या सुमारास संबंधित विद्यार्थिनी पालकांसह परिचर्या महाविद्यालयात आली. तेथेच संशयिताकडून हमीपत्र घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.









