प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संयमी व कुशल नेतृत्वाने राज्याचे प्रशासन गेले चार महिने कोरोनाच्या महासंकटाशी लढा देत आहे. कोरोना लढय़ात अविरत कार्यरत असणारे सर्वच योद्धे देखील अभिनंदनास पात्र आहेत. शिवसैनिकही सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत आहे. कोरोनाच्या या काळात सीपीआरमधील आरोग्य यंत्रणा आणखीन सक्षम करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
कोरोना महामारीचे संकट देशासह राज्यावर घोंगावत असताना शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी वाढदिवस साजरा न करता कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन तमाम शिवसैनिकांना केले आहे. या आवाहनानुसार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या 4217 या हेडमधून मंजूर झालेल्या 1 कोटींच्या निधीतून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे खाटांचे (बेड) व कपाटे आदी साहित्य सोमवारी प्रदान करण्यात आले. साहित्य प्रदान करण्यात आले.
यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर, सीपीआरच्या अधिष्ठाता डॉ. सौ.आरती घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी. केम्पीपाटील, डॉ.अजित लोकरे, अभ्यागत समिती सदस्य सुनील करंबे, शशिकांत रावळ-वाघमारे, महेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
क्षीरसागर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा शिवसैनिकांना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करण्याची शिकवण दिली. त्यानुसार प्रत्येक शिवसैनिक कार्यरत आहे. आज पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक कामाच्या शिकवणीनुसार सीपीआरला एक कोटींचे बेड आणि कपाटे देताना वेगळा आनंद आहे. गेली दहा वर्षे सीपीआरला सक्षम करण्याचे काम केले, यापुढेही सीपीआरची आरोग्य यंत्रणा आणखी बळकट करण्यास आपण कटिबद्ध राहू, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरातील विविध विकास कामे, सुधारणा यासह सीपीआर रुग्णालयाच्या सुधारणेत केलेले काम हे त्यांच्या कार्याची पोहचपावती देते. कोरोना विरुद्धच्या लढय़ात त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला असून, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे काम केले आहे. गेल्याच महिन्यात त्यांच्या माध्यमातून सीपीआर रुग्णालयास स्वतंत्र कोरोना वॉर्ड देणगी स्वरूपात देण्याचा उपक्रम पार पडला तर आज एक कोटींचे बेड आणि कपाटे प्रदान करण्यात आली आहेत.