वडील बचावले, आईचा शोध सुरु, सीना नदीवरील कलकर्जाळ येथील बंधाऱ्यावरील घटना
प्रतिनिधी/अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील सीना नदीवरील कलकर्जाळ बंधाऱ्यावरून मोटरसायकलचा तोल गेल्याने पाण्यात पडलेल्या एक वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पाण्यात पडलेल्या आईचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही. तर वडील जखमी झाले असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले. हे सर्व अक्कलकोट तालुक्यातील मुंडेवाडी येथील रहिवासी आहेत.
ही घटना शुक्रवारी दि. 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. यात आनंद रेवणसिद्ध माळगे (वय 25) हे जखमी झाले असून, सुप्रिया आनंद माळगे (वय 20) या महिलेचा शोध लागलेला नाही. तर संजीवनी आनंद माळगे या एक वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आनंद माळगे यांनी आपली पत्नी सुप्रिया माळगे व मुलगी संजीवनी त्यांना सोबत घेऊन आपल्या दुचाकीवरून मंद्रूप येथे सुप्रिया यांच्या आजीला भेटण्यासाठी गेले होते. त्यांना भेटून सायंकाळी हत्तरसंग कुडल येथील संगमेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन मुंढेवाडी येथील आपल्या गावाकडे निघाले होते. मुलीसाठी खेळणी खरेदी करून आणले होते. दरम्यान सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सीना नदीवरील बंधारा येथे ओलांडून जाताना तोल जाऊन पाण्यात पडले. यात आनंद माळगे याला बाहेर काढण्यात यश आला. सुप्रिया माळगे या महिलेचा शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम करूनही शोध लागलेला नाही. तर एक वर्षाची मुलगी संजीवनी ही पाण्यावर तरंगताना आढळून आली. ही घटना घडल्याची माहिती कळताच नागरिकांनी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. या घेटनेची माहिती समजताच मंद्रुप, अक्कलकोट पोलीस ठाण्याचे पोलीस रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घटना स्थळी दाखल झाले.
सुमारे चार फूट रुंदीचा बंधारा
दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या दोन्ही तालुक्याच्या सीमेवर सीना नदीवर हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असून याची रुंदी केवळ सुमारे चार फूट आहे. गेल्या नोव्हेंबर महापूर आल्याने एका बाजूचा भराव वाहून तुटला आहे. केवळ दोन फुटाच्या रस्त्यावरून बंधाऱ्यावर जावे लागते. तर कलकर्जाळच्या बाजूला सुमारे 20 फुटातून अधिक चढण चढावे लागते. हा बंधारा धोकादायक असून याकडे पाटबंधारा खाते दुर्लक्ष केले आहेत.








