शहरातील पंपासमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा : समस्या वारंवार उद्भवत असल्याने वाहन चालकांमध्ये संतापाची लाट

प्रतिनिधी /बेळगाव
शहरात बुधवारी सीएनजीचा अचानक तुटवडा जाणवू लागल्याने सीएनजी पंपासमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पेट्रोलपेक्षा सीएनजी परवडणाऱया दरात उपलब्ध होत असल्याने सीएनजीवर चालणाऱया वाहनांची संख्या वाढली आहे. परंतु सीएनजी उपलब्ध नसल्याने वाहनांना पुन्हा एकदा पेट्रोलकडे वळावे लागले. सीएनजीचा तुटवडा ही समस्या वारंवार उद्भवत असल्याने वाहन चालकांमध्ये संतापाची लाट आहे.
बेळगाव शहरामध्ये चार ठिकाणी सीएनजी स्टेशन आहेत. परंतु या चारही ठिकाणी सीएनजी उपलब्ध नसल्याने बुधवारी सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये रिक्षांची संख्या सर्वाधिक होती. बेळगावमध्ये सीएनजीवर चालणाऱया शेकडो रिक्षा असून त्या सीएनजी पंपांसमोर दिवसभर उभ्या होत्या.
उत्तर भागातच चार स्टेशन
सीएनजी भरणारे सर्वच पंप हे शहराच्या उत्तर भागात आहेत. त्यामुळे दक्षिण भागातील नागरिकांना सीएनजी भरण्यासाठी शहराच्या उत्तर भागात यावे लागते. त्यामुळे दक्षिण भागात एखादा पंप झाल्यास वाहनधारकांच्या सोयीचे होणार आहे. यापूर्वीही मागणी करण्यात आली होती. परंतु अद्यापही याची दखल कोणीच घेतली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
दिवसभराचे भाडे वाया

बेळगाव शहरातील चारही सीएनजी पंपावरील वितरण बंद आहे. बुधवारी सकाळपासूनच सीएनजी उपलब्ध नसल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. 4 ते 5 तास रांगा लावूनही सीएनजी नसल्याने चालक पुन्हा माघारी परतले. यामुळे दिवसभराचे भाडे वाया गेले असून सीएनजी वितरण सुरळीत करावे.
– राजेश कांबळे (रिक्षाचालक)
आर्थिक घडी विस्कटली

आधीच कोरोनामुळे दोन महिने व्यवसाय ठप्प असल्याने घरी बसण्याची वेळ आली होती. आता काही प्रमाणात भाडे मिळत असताना सीएनजी नसल्याने आर्थिक घडी विस्कटत आहे. इन्शुरन्स, पासिंग हे वेळच्यावेळी भरावे लागत असल्याने व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
– अल्ताफ मुजावर (रिक्षाचालक)









