कुडाळ येथील बैठकीत निर्णय
वार्ताहर / कुडाळ:
सीएए कायद्याला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध, असाच याचा अर्थ होत आहे. देशात इतरांना कोणताच त्रास नाही मात्र पाकिस्तान, बांग्लादेश सारख्या देशात हिंदूंची संख्या चिंताजनकरित्या घटत चालली आहे. यासाठी आता आपले सामर्थ्य दाखविणे आवश्यक आहे. यासाठी कुडाळ येथे 20 फेब्रुवारी रोजी प्रांताधिकारी कार्यालयावर या कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याचा एकमुखी निर्णय कुडाळ येथे बैठकीत घेण्यात आला. सीएए कायद्याच्या समर्थनार्थ गावागावात जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. मोर्चानंतर शासनाला प्रांताधिकारी यांच्यामार्फत हजारो सहय़ांचे निवेदन सादर करण्याचे नियोजन करण्यात आले. मोर्चात ढोलपथकही समाविष्ट करून या कायद्याचा कुडाळात जल्लोषही साजरा करण्यात येणार आहे.
कुडाळ माठेवाडा येथे ही बैठक झाली. सीएए कायदा तसेच एनआरसीबाबत चर्चा करून हा कायदा देशहितासाठी खरोखरच महत्वाचा आहे हे अधोरेखित करण्यात आले. देशात जवळपास 500 ठिकाणी हिंदूंना आपले सण साजरे करता येत नाहीत. इतरांचे संख्याबळ वाढल्याने सगळेच बंद, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी आता रस्त्यावर उतरून या कायद्याचे समर्थन करणे आवश्यक आहे. आपल्या भागातही काही बांग्लादेशी असण्याची शक्मयता आहे. गेल्या काही वर्षांपासून काश्मीरमध्ये हिंदू विस्थापित झाले, त्यांच्याबद्दल कोणालाच कळवळा नाही मात्र घुसखोरांबाबत कळवळा का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
राजकारण बाजूला ठेवून स्वतःच्या अस्तित्वासाठी आता जागे झाले पाहिजे, या कायद्याचा गावागावात प्रसार करणे आवश्यक आहे. 1955 पासूनचा हा कायदा असून या शासनाने हा कायदा पुढे आणला आहे. महात्मा गांधींचे विचार घेऊन हा कायदा तयार केला आहे. यासाठी गावागावात पत्रके वितरित करुया, या कायद्याबाबत प्रत्येकाशी चर्चा करूया. गावागावात सहय़ांची मोहीम राबविणे, तरुण वर्गाला यात सहभागी करून घेऊन गावागावात जनजागृती अभियान राबविण्याबाबतचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 20 रोजी काढण्यात येणारा मोर्चा हा कुडाळ आंबेडकरनगर येथून सुरुवात होऊन कुडाळ प्रांताधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन त्याची सांगता होणार आहे, असे बैठकीत सांगण्यात आले.









