प्रतिनिधी/चिपळूण
सीईटी परीक्षेचे केंद्र जिल्हय़ातच असावे यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना दिलेल्या पत्राची त्यांनी दखल घेतली आहे. त्यामुळे या परीक्षेचे केंद्र आता जिल्हय़ातच राहणार असल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, सीईटी परीक्षेसाठी जिल्हय़ातील विद्यार्थ्यांना पुणे, ठाणे, कोल्हापूर येथे परीक्षा केंद्रे देण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या वातावरणामुळे बाहेर जाऊन परीक्षा द्यावी लागणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही बाब आपल्या लक्षात आणून दिली. त्यानुसार तसे पत्र आपण पाठवून हे केंद्र जिल्हय़ात ठेवण्याची विनंती केली होती.
या पत्राची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी केवळ रत्नागिरी जिल्हय़ातीलच नाही तर अन्य जिह्यांतील विद्यार्थ्यांनाही त्यांच्याच जिह्यात नजीकच्या ठिकाणी परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे नमूद केले आहे.









