बेंगळूर, म्हैसूरमधील विद्यार्थी आघाडीवर : सर्वच विभागात मुलीच सरस
प्रतिनिधी/ बेंगळूर
अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक कोर्स प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर करण्यात आला. निकालात बेंगळूर आणि म्हैसूरमधील विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली आहे. यंदा सीईटीसाठी 1,94,419 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1,75,349 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. रँक देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना निवड केलेल्या विभागाच्या कोर्ससाठी महाविद्यालयांमध्ये सरकारी कोटय़ातून प्रवेश मिळणार आहे.
कोरोनासंकट असताना देखील 30 आणि 31 जुलै रोजी राज्यभरात सीईटी घेण्यात आली होती. त्यापैकी 1,53,470 विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशासाठी रँक देण्यात आले आहेत. नॅच्युरोपॅथी, योगीक सायन्ससाठी 1,29,611 त्याचप्रमाणे बीएससी कृषी विभागातील प्रवेशासाठी 1,27,627 विद्यार्थ्यांना रँक देण्यात आले आहेत. पशूवैद्यकीय कोर्ससाठी 1,29,666 जणांना, बी. फार्मासाठी 1,55,552 व डी. फार्मासाठी 1,55,668 जणांना रँक देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निकालामध्ये अभियांत्रिकीसह सर्वच विभागात मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत. कोरोनासंकट असताना देखील अत्यंत सुरक्षितपणे सीईटी घेण्यात आली आहे. परीक्षेनंतर केवळ 20 दिवसांत निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. परीक्षेसाठी याआधी राज्यभरात केवळ 53 केंद्रे होती. परंतु, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कोरोना मार्गसूचीचे पालन करण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या 75 ने वाढविण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱया 63 विद्यार्थ्यांनी देखील परीक्षा दिली होती, अशी माहिती डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.
रँकींगमध्ये बदल शक्य
विविध विषयांमध्ये रँक मिळालेले विद्यार्थी निकालावर संतुष्ट नसतात. ते अधिक गुणांची अपेक्षा बाळगून फेरमूल्यमापनासाठी अर्ज करतात. त्यामुळे रँकच्या यादीमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आघाडीवर असणाऱया विद्यार्थ्यांच्या रँकींगमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. केवळ रँक दिल्यामुळे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरतात असे नाही. कागदपत्रे, प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतरच त्यांना प्रवेश दिला जातो, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.
विभागनिहाय आघाडीवरील विद्यार्थी…
@ अभियांत्रिकी
एम. रक्षीत – आर. व्ही. पदवीपूर्व महाविद्यालय, बेंगळूर
आर. शुभन – श्री चैतन्य इ-टेक्नो स्कूल, बेंगळूर
एम. शशांक बालाजी – बेस पदवीपूर्व महाविद्यालय, हुबळी,
@ बीएससी कृषी
ए. बी. वरुणगौडा – एक्स्पर्ट पदवीपूर्व महाविद्यालय, मंगळूर
के. संजना – बेस पदवीपूर्व महाविद्यालय, म्हैसूर
लोकेश बी. जोगी – श्री रामकृष्ण विद्याशाला पदवीपूर्व महाविद्यालय, म्हैसूर
@ पशूवैद्यकीय
पी. साई विवेक – नारायण इ-टेक्नो स्कूल, बेंगळूर
आर्यन एम. चन्नाळ – प्रगती पब्लिक सेकंडरी स्कूल, कोट
के. संजना – बेस पदवीपूर्व महाविद्यालय, म्हैसूर
@ बी. फार्मा/डी. फार्मा
पी. साई विवेक – नारायण इ-टेक्नो स्कूल, बेंगळूर
संदीपन नास्कर – परराज्यातील विद्यार्थी
पवन एस. गौडा – नारायण पदवीपूर्व महाविद्यालय, बेंगळूर
@ योगा विज्ञान/नॅच्युरोपॅथी
पी. पी. अर्णव अय्यप्पा – अल्वास पदवीपूर्व महाविद्यालय, मुडबिद्री-मंगळूर
के. संजना – बेस पदवीपूर्व विद्यालय, बेंगळूर
पी. साई विवेक – नारायण इ-टेक्नो स्कूल, बेंगळूर









