जम्मू-काश्मीरच्या शोपियानमधील घटना
@श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानाची गोळय़ा झाडून हत्या केली. गेल्या तीन दिवसांतील हा चौथा दहशतवादी हल्ला आहे. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमधील छोटेपोरा गावात सुट्टीवर गेलेल्या सीआरपीएफ जवानाची दहशतवाद्यांनी गोळय़ा झाडून हत्या केली. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियानचे रहिवासी असलेले सीआरपीएफ जवान मुख्तार अहमद दोही यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. काश्मीरमध्ये दोन गावप्रमुखांची हत्या झाल्याच्या दोन घटनांनंतर ही घटना घडली आहे. याआधी खानमोहचे सरपंच बशीर अहमद भट आणि त्यानंतर शुक्रवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी भाजपशी संबंधित शब्बीर अहमद मीर यांची गोळय़ा झाडून हत्या केली.









