एका जवानासह चार नागरिक जखमी
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्हय़ामध्ये दहशतवाद्यांनी सलग तिसऱया दिवशी हल्ला करत सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी केलेल्या या ग्रेनेड हल्ल्यात सीआरपीएफच्या 181 बटालियनचा एक जवान जखमी तर चार स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरु आहेत. तर सेनादलाच्या विविध तुकडय़ांनी परिसराची नाकाबंदी केली असून शोध अभियान जारी करण्यात आले आहे.
याआधीही सोमवारी आणि गेल्या शुक्रवारीही दहशतवाद्यांनी सीआरपीएफवर हल्ला केला होता. सोमवारी कुपवाडा जिल्हय़ात झालेल्या हल्ल्यामध्ये तीन जवान हुतात्मा झाले. तर चार जवान जखमी झाले होते. कारमधून आलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफला लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. या कारवाईमध्ये दोन दहशतवादीही ठार झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी दि रिजिंटेस पंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.
या हल्ल्यानंतर सीआरपीएफसह सेनादल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष पथकाचे अधिकारी घटनास्थळी आले. स्थानिक अधिकाऱयांच्या अंदाजानुसार हा हल्ला काही वर्षांपूर्वी शरण आलेल्या क्रालगुंड येथील दहशतवादी गनीभाई क्रालगुंड आणि त्याच्या साथीदारांनी केला असावा. गेल्या दीड वर्षांपासून तो पुन्हा सक्रीय झाल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. घटनास्थळाजवळ एक मृतदेह आढळून आला.तथापि त्याची ओळख पटली नसून त्याच्याजवळ कोणतीही हत्यारे सापडली नसल्याचे सीआरपीएफचे प्रवक्ते पंकजसिंह यांनी सांगितले.









