ट्रकमधून काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला
वृत्तसंस्था/ श्रीनगर
ट्रकमधून हत्यारांसह काश्मीर खोऱयात घुसखोरीचा प्रयत्न सीआरपीएफ व जम्मू काश्मीर स्थानिक पोलिसांनी हाणून पाडला आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावर नगरोटाजवळील बन्न टोलनाक्यावर तपासणीसाठी ट्रक अडवल्यावर दहशतवाद्यांनी पोलीस व जवानांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सजग जवानांनी जोरदार कारवाई करत 3 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. तर एकाचा शोध सुरु करण्यात आला असून रात्री उशीरापर्यंत या परिसरात शोधमोहिम सुरु आहे.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही संयुक्त कारवाई करण्यात आली. नगरोटाजवळील बन्न टोलनाक्यावर ही चकमक उडाली. मात्र जम्मू पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी दहशतवाद्यांना तोंड वर काढू दिले नाही. त्यांच्याच भाषेत जोरदार गोळीबार करत तीन दहशतवाद्यांना जागेवरच टिपले. तर यातील एकजण पळून गेला आहे. या ट्रकमधून हत्यारांसह तीन ते चार दहशतवादी श्रीनगरकडे निघाले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. हा ट्रक ताब्यात घेतला असून तपासणी सुरु केली आहे.
जम्मुचे पोलीस आयुक्त मुकेशसिंह यांनीही जवानांच्या कारवाईला दुजोरा दिला असून या हल्ल्यामध्ये तीन दहशतवादी मारले गेल्याचे स्पष्ट केले. या दहशतवाद्यांनी प्रशासकीय यंत्रणांना चकमा देण्यासाठी लष्कराचाच पोशाख परिधान केला होता. तथापि सीआरपीएफ आणि जम्मू पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांच्या संशयास्पद हालचाली हेरुन त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारला प्रत्युत्तर दिले. या चकमकीमध्ये एक सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे.
तर जम्मू काश्मीरचे महासंचालक दिलबागसिंह यांनी सांगितले की, चार दहशतवादी असण्याची शक्यता असून तीनजणांचा खात्मा करण्यात आला असून एकजण जवळच्या जंगलात पळून गेला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी अतिरिक्त तुकडय़ा तैनात केल्या आहेत. त्याशिवाय या मार्गावरील वाहतूकही कमी करण्यात आली असून परिसरातील सर्व शाळा, संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत, असे सांगितले. उधमपूरचे जिल्हा विकास आयुक्त पियुष सिंगला यांनी सांगितले की, उधमपूर विभागामध्ये सुरक्षा दलांच्या या कारवाईनंतर शैक्षणिक संस्था तसेच विविध संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी पहाटेपासून सुरु असणारी ही चकमक रात्री उशीरापर्यंत सुरु आहे. शनिवारी परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेतले जातील, असे सिंग यांनी सांगितले.
दरम्यान, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी एका कारवाईमध्ये कुपवाडा येथे एका दहशतवाद्याला अटक केली. तो हिजबुल मुजाहिद्दीनचा सदस्य असून फयाज मीर असे त्याचे नाव आहे. गेल्या चार महिन्यांपासून तो या परिसरात सक्रीय होता. त्याच्याकडून एक एके47 रायफल जप्त केली आहे, असेही सिंग यांनी सांगितले.









