निमलष्करी दलातील 481 जण पॉझिटिव्ह
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकाता येथील इंडियन म्युझियममध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या 50 वर्षीय सीआयएसएफ जवानाचा कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. संबंधित जवान एएसआय पदावरील असून त्याच्यावर कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील सर्व जवानांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यापूर्वी गुरुवारी मुंबई विमानतळावर तैनात सीआयएसएफ जवानाला कोरोनाची लागण झाल्याने प्राण गमवावे लागले होते. आतापर्यंत सीआयएसएफच्या 32 जवानांसह निमलष्करी दलातील 481 जणांचे वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. बीएसएफमधील सर्वाधिक 195 जवान कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच सीआरपीएफमधील 159 जणांना बाधा झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गृह मंत्रालयाच्या कंट्रोल रुममध्ये कार्यरत असलेल्या दोन जवानांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. आयटीबीपीमधील एका हेड कॉन्स्टेबलचाही यापूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला असून या दलातील 82 जण संक्रमित झाले आहेत.









