कोरोनावर मात करीत आजपासून पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या सेवेत : कटू आठवणी विसरण्याचा प्रयत्न
- कठीण काळात पाठिशी उभे राहाणाऱया सर्वांचे मानले आभार
- यापुढे अधिक अनुभवानिशी रुग्णांची सेवा करण्याचा निर्धार
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांची सेवा करता करता स्वत: कोविड पॉझिटिव्ह बनलेल्या अधिपरिचारिका तृप्ती पुजारे हय़ा कोरोनावर यशस्वीपणे मात करीत मोठय़ा आत्मविश्वासानिशी पुन्हा एकदा कोविड रुग्णांच्या सेवेत आजपासून रुजू होत आहेत. कोरोनावर यशस्वीपणे मात कशी करायची, मानसिक ताणतणावांचा सामना कसा करायचा, याचा परिपूर्ण अनुभव आपण घेतला असून आपल्या या अनुभवाचा उपयोग कोविड उपचारासाठी दाखल झालेल्या प्रत्येक रुग्णासाठी करण्याकरीता आपण सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयातील कोविडग्रस्तांच्या सेवेत कार्यरत असताना तृप्ती यांना कोरोनाची लागण झाली. सर्व त्या सुरक्षाविषयक उपाययोजना करूनही त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 3 जून रोजी त्यांनाच रुग्णालयाच्या आयसोलेशन विभागात दाखल व्हावं लागलं. सात दिवस आयसोलेशन विभागात उपचार घेत त्या मृत्यूच्या दाढेतून सुखरुप बाहेर आल्या. त्यांना पुढील सात दिवस होम क्वॉरंटाईन करण्यात आलं. 17 जून रोजी होम क्वॉरंटाईनमधून बाहेर आल्यानंतर त्यांना आणखी सात दिवसांची विश्रांती देण्यात आली. विश्रांतीचा काळ संपल्यानंतर तृप्ती पुजारे गुरुवारी मोठय़ा आत्मविश्वासानिशी पुन्हा सेवेत रुजू होत आहेत.
पाठिशी उभे राहणाऱयांचे मानले आभार
‘कोरोना वॉरियर’ बनून खऱया अर्थाने कोरोनाचा पराभव करणाऱया तृप्ती यांच्याशी संवाद साधला असता प्रथम त्यांनी या अतिशय कठीण काळात आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणाऱया पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, रुग्णालय प्रशासन, सर्व सहकारी व विशेष म्हणजे ‘तरुण भारत’चे मनापासून आभार मानले. या अतिशय कठीण काळातील ते अकरा दिवस आपण कधीच विसरू शकणार नाही, असं त्या म्हणाल्या. या अतिशय कठीण काळात माझ्यामागे ठामपणे उभे राहणाऱया प्रत्येकाची आपण सदैव ऋणी राहीन. त्याचबरोबर या काळात मला व माझ्या कुटुंबियांना प्रचंड त्रास देणाऱयांचेही आवर्जून आभार मानेन. कारण या त्रास देणाऱया प्रवृत्तींविरुद्ध कसं लढावं, याचा अनुभव आपणास मिळाला. हा अनुभव कोरोनाशी लढा देणाऱया अन्य रुग्णांशी शेअर करून त्यांचे मनोबल वाढवणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
बदनामीचा करावा लागला सामना
स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचविण्याकरीता धडपडणाऱया तृप्ती यांना, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच त्या राहत असलेल्या गावातील काही मंडळींनी प्रचंड त्रास दिला. तिच्यासह तिच्या कुटुंबियांना वाळीत टाकण्यापर्यंत त्यांची मजल गेली. सोशल मीडियावरून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्नही काहींनी केला. या बाबत तृप्ती यांनी जिल्हाधिकाऱयांकडे थेट तक्रार देखील केली होती. ‘तरुण भारत’ने हे प्रकरण उचलून धरताच पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांनी तृप्ती यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना आधार दिला. या काळात तृप्ती यांच्या कुटुंबियांसह त्यांच्यासोबत वावरणाऱया सर्व सहकाऱयांच्या स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या. त्या सर्वच्या सर्व निगेटिव्ह निघाल्या. त्या सर्वांनी आपला क्वारंटाईन काळ यशस्वीपणे पूर्ण केला.
झालेला मनस्ताप कोविडपेक्षाही गंभीर – तृप्ती पुजारे
आपल्या कटू आठवणींबाबत बोलताना तृप्ती म्हणतात, संकटे, महामारी, रोगराई या गोष्टी जगाच्या अंतापर्यंत सुरूच राहणार आहेत. अशावेळी माणुसकी विसरून चालणार नाही. संकटाचा यशस्वीपणे मुकाबला करायचा असेल, तर या संकटसमयी संपूर्ण समाजाने आपापसातील हेवेदावे विसरून एका कुटुंबाप्रमाणे राहिले पाहिजे. आपणास मदत करणे शक्य नसेल, तर किमान आपद्ग्रस्तांना मनस्ताप तरी देऊ नका. कारण हा मनस्ताप कोविडपेक्षाही गंभीर असतो. आरोग्य कर्मचारी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता स्वत:च्या कुटुंबापासून दूर राहून लढत आहेत. त्यांची अवहेलना न करता त्यांचा आदर करा, हीच सर्वांना विनंती असल्याचे त्या म्हणाल्या.









