कोरोना योद्धेच बाधीत जिल्हय़ात 61 नवे रूग्ण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा शासकीय रूग्णालयातील भूलतज्ञ व बालरोगतज्ञनही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. गुरूवारी रात्री व शुक्रवारी आलेल्या अहवालांमध्ये दोन प्रमुख वैद्यकीय अधिकाऱयांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर सिव्हीलच्या आणखी दोन स्टाफ नर्सना कोरानाची लागण झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिली. दरम्यान, गुरूवार सायंकाळापासूनच्या 24 तासांत जिल्हय़ात 61 नवे रूग्ण आढळल्याने बाधीतांची संख्या 1499 झाली आहे.
61 नवे रूग्ण
गुरूवारी रात्री उशीरा व शुक्रवारी आलेल्या अहवालांमध्ये जिल्हय़ात नवे 61 रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये रत्नागिरी येथे नमुने घेतलेले 31, घरडा 11, दापोली 4 व कळंबणी येथील 15 जणांचा समावेश आहे.
46 जण कोरोनामुक्त
शुक्रवारी 46 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोनामुक्तांची संख्या 904 झाली आहे. शुक्रवारी डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 5, संगमेश्वर 1, वेळणेश्वर 5, दापोली 8, कामथे 1, समाजकल्याण रत्नागिरी 4, घरडा खेड 12, पाचल 5 आणि मंडणगडमधील 5 जणांचा समावेश आहे.
जिल्हय़ात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर आता कोरोना योध्देच बाधीत होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. जिल्हा रूग्णालयातील 7 स्टाफ नर्सना व काही ट्रेनी नर्सना यापुर्वी कोरानाची लागण झाली होती. त्यामुळे जोखीम पत्करून मात्र सुरक्षीतेची खबरदारी घेऊन येथील कर्मचारी सेवा बजावत आहेत.
कोराना योद्धेच बाधीत
गुरूवारी रात्री भूलतज्ञांचा व त्यापाठोपाठ शुक्रवारी बालरोगतज्ञाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. या बालरोग तज्ञांनी अनेक बालकांना कोरोनातून बाहेर काढण्यात महत्वाची भुमिका बजावली असून गुरूवारी शासकीय रूग्णालयाच्या सेवेतून मुक्त झाले होते. मात्र, सकाळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. या डॉक्टरांसोबतच्या त्यांच्या पत्नी व मुलगीलाही कोरोनाची लागण झाली आहे.
खासगी रूग्णालयातील बाधीत संख्या 17 वर
रत्नागिरी शहरातील एका नामांकित खाजगी हॉस्पीटलमधील कोरोनाचा विळगा आणखी घट्ट झाला आहे. या रूग्णालयातील कोरोनाबाधीतांची संख्या 17 वर पोहचली आहे. तीन दिवसापूर्वी 10 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले असताना नव्या 7 रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे हॉस्पीटल बंद ठेवण्यात आले आहे.
रत्नागिरी तालुक्यातील कंटेन्मेंट झोन
जुना माळनाका, कोतवडे सनगरेवाडी, लांजेकर कम्पाऊंड, भागिर्थी अपार्टमेंट, फिनोलेक्स कॉलनी, क्रांतीनगर, झारणी रोड, आरोग्य मंदिर, स्टँडर्ड अपार्टमेंट ही क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
जिह्यात 148 कंटेन्मेंट झोन
जिल्हय़ात 146 कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 26 गावांमध्ये, दापोली 2, खेड 35, लांजा 6, चिपळूण 65, मंडणगड 3 , गुहागर 8 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
448 अहवाल प्रलंबीत
जिल्हा रुग्णालयामार्फत 15 हजार 415 नमुने तपासण्यात आले. त्यातील 1499 अहवाल पॉजिटीव्ह तर 13 हजार 499 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 448 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहेत.
अंजनवेलचा पोस्टमन बाधीत
गुहागरः तालुक्यातील अंजनवेलचे पोस्टमनचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे. तालुक्यातील बाधीतांची संख्या 78 झाली आहे. अंजनवेलमध्ये प्रथमच कोरोना पॉझीटीव्ह सापडला असून त्याला त्रास जाणवू लागल्याने अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या पोस्टमनला नेमकी कोणाकडून लागण झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. केवळ कार्यालय व गावात पोस्टासंदर्भात कामे केली जात होती. पोस्टमनच्या संपर्कात आलेल्या घरातील, ऑफिसमधील व्यक्ती मिळून 17 जणांची यादी हायरिस्क म्हणून घेण्यात आली असून त्यांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. अंजनवेल पोस्ट ऑफिसचे कामकाज बंद करण्यात आले आहे.
खेडमध्ये आणखी 28 कोरोनाबाधित
खेडः तालुक्यात 28 नवे रूग्ण सापडले असून त्यात एक पोलीस कर्मचारी व डॉक्टरचा समावेश आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनी व्यवस्थापनाने केलेल्या चाचणीत 13 जण पॉझीटीव्ह आढळले आहेत. यात लोटे 4, असगणी 3, आवाशी व घाणेखुंट प्रत्येकी 2, जांबुर्डे, लवेल प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. तर कळंबणी रूग्णालयातील अहवालामध्ये 15 जण पॉझीटीव्ह आढळले आहेत. यात आवाशी 4, कासार आळी व फुरूसमधील 2, तर लवेल धाडवेवाडी, धामणदेवी, सालीवाडा, खोंडे रोड, महाडनाका, गुलमोहर पार्क व भरणेयेथे प्रत्येकी 1 रूग्ण सापडला आहे.









