प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या नवीन विषाणूच्या संसर्गाबाबत खबरदारी म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तीन वॉर्ड सज्ज ठेवण्यात आले आहेत. सध्या कोरोना नियंत्रणात आहे. परंतु संभाव्य शक्मयता लक्षात घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 55 बेडची सोय असलेले तीन कोरोना वॉर्ड सज्ज ठेवण्यात आले आहेत.
धारवाडमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बेळगावमध्ये पुन्हा एकदा शंकेची पाल चुकचुकली. हळूहळू बेंगळूर, हासन या जिल्हय़ांमध्ये तसेच महाराष्ट्र आणि केरळमध्येही रुग्णांची संख्या वाढती आहे हे लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व जिल्हय़ांना खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.
परराज्यातून येणाऱया नागरिकांना कर्नाटकात प्रवेश करताना आरटीपीसीआरची सक्ती करण्यात आली आहे. दोन डोस घेतले असतील तरच प्रवेश दिला जात आहे. एखादा जरी रुग्ण आढळला तरी सर्व ती काळजी घेणे आवश्यक आहे या हेतूने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 55 बेडची व्यवस्था असलेले तीन वॉर्ड तैनात करण्यात आले आहेत.









