परिचारिका, कर्मचाऱयांवर थुंकण्याचा धोकादायक प्रकार, प्रशासनाने दिली समज
प्रतिनिधी/ बेळगाव
निजामुद्दीन येथील तबलिग कार्यक्रमाला हजेरी लावून बेळगावला परतलेल्यांपैकी 40 हून अधिक संशयितांना सिव्हिल हॉस्पिटलमधील क्वारंटाईन विभागात दाखल करण्यात आले आहे. या विभागात उपचार घेणाऱया संशयितांनी मस्तवालपणाचा कळस गाठला असून परिचारिका व कर्मचाऱयांवर थुंकण्याचा धोकादायक प्रकार केला.
संशयितांचे विलगीकरण करुन त्यांना एकमेकांपासून अंतर राखण्याचा सल्ला दिला जात असला तरी क्वारंटाईन विभागात एकत्र बसणे, एकत्र जेवणे आदी प्रकार सुरू आहेत. अशा प्रकारांवर आळा घालण्याचा प्रयत्न करणाऱया कर्मचाऱयांवर थुंकण्याचा निंद्य प्रकार घडत असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली असून संशयितांची सेवा करणाऱया परिचारिका व वैद्यकीय कर्मचारी धास्तावले आहेत.
प्रशासनाने कोरोना थोपविण्यासाठी सध्या सामूहिक प्रार्थनेवर आळा घातला आहे. सुरक्षित अंतर राखून आपापल्या घरी धार्मिक विधी किंवा प्रार्थना करण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र प्रशासनाचा सल्ला डावलून या विभागात मनमानी कारभार करण्यावरच संशयितांनी भर दिल्याचे दिसून येत आहे.
संशयितांना सात्वीक आहाराचा सल्ला दिला जातो. मात्र चक्क बिर्याणी मागवून एकत्रित मेजवानी करण्याचे प्रकार सुरू आहेत. ही गोष्ट या विभागात काम करणाऱया कर्मचाऱयांनी बिम्स् प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. येथील वरि÷ अधिकाऱयांनी संशयितांना समज दिली आहे. तुमच्या हितासाठीच नियम पाळण्याची गरज आहे, असे त्यांना सांगण्यात आले आहे.
संशयितांचा मस्तवालपणा व हुल्लडबाजीचा प्रकार पाहून या विभागात काम करण्यास कर्मचारी तयार होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासन, बिम्स् प्रशासन व आरोग्य विभागाने प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू केले आहेत. अशा परिस्थितीत संशयितांच्या मस्तवालपणामुळे अनेकांची डोकेदुखी वाढली आहे. या विभागाबाहेर पोलीस तैनात करण्यात आले असले तरी संशयितांची मनमानी थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे.









