डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप : एपीएमसी पोलिसांकडून कुटुंबीयांची दिशाभूल, नागरिकांमधून तीव्र संताप
प्रतिनिधी /बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलबद्दल नेहमीच नागरिकांमधून तक्रारी होत असतात. हॉस्पिटलमध्ये आवश्यक सुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असते. अशातच डॉक्टरांबाबतही तक्रारी करण्यात येत असतात. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलचा कारभार नेहमीच चर्चेत असतो. आता प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा प्रसूतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. या प्रकारामुळे त्या महिलेच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. तसेच या घटनेमुळे नागरिकांतूनही तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बैलहोंगल तालुक्मयातील केंगनूर गावची पवित्रा मडिवाळ हिला दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ती प्रसूत होऊन तिला तिळे झाले. त्यानंतर सकाळी डय़ूटीवर असलेले डॉक्टर संध्याकाळी रजेवर गेल्याने तिला पाहण्यासाठी कोणीच नव्हते. तिच्या कुटुंबीयांनी तेथील रखवालदार आणि वॉर्डबॉय यांचीही मनधरणी केली. मात्र तिच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. शेवटी संबंधित डॉक्टरला फोन करण्यात आला. त्यानंतर त्यांनी सदर महिलेची प्रकृती गंभीर झाली असेल तर तिला आयसीयुमध्ये दाखल करा, असे सांगितले.
आयसीयुमध्ये दाखल केल्यानंतर तिच्यावर योग्य प्रकारे उपचार केले गेले नाहीत. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला असून तिच्या मृत्युमुळे तीन मुले आता आईला मुकली आहेत. या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. नेहमीच सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूतीगृहाबद्दल तक्रारी होत असतात. अत्यवस्थ झालेल्या महिलांवर वेळेत उपचार केले तर त्यांचा जीव वाचू शकतो. पवित्रा हिच्यावर डॉक्टरांनी काळजीपूर्वक उपचार केले असते तर तिचा जीव नक्कीच वाचला असता. अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
या घटनेनंतर सिव्हिल आणि तेथील डॉक्टरांच्या विरोधात तक्रारी देण्यासाठी एपीएमसी पोलिसांकडे पवित्राच्या कुटुंबीयांनी धाव घेतली. मात्र, एपीएमसी पोलिसांनीही तिच्या कुटुंबीयांची दिशाभूल केली आहे. ‘जर तक्रार दिली तर शवविच्छेदन करावे लागणार आहे. त्यामुळे तीन दिवस वेळ लागणार’, असे सांगून पोलिसांनीही जबाबदारी झटकली आहे. यामुळे पोलिसांबद्दलही तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकूण या प्रकारामुळे बिम्स प्रशासनाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत.









