मंडोळी येथील मारुती भोसले यांचा आरोप : हॉस्पिटलमधील गैरप्रकाराबाबत मांडली व्यथा
प्रतिनिधी / बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोणत्याच प्रकारचे उपचार योग्यप्रकारे मिळत नाहीत. औषधोपचार करण्यास दिरंगाई होते. रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मृत्यू पावणाऱयांची संख्याही अधिक आहे. दररोज 10 ते 15 जणांचा मृत्यू होत आहे. मात्र सरकारी आकडय़ात केवळ दोन ते तीन मृत्यू झाल्याचे दाखविण्यात येत आहे. ही बाब दुर्दैवी आहे. मी स्वतः या घटनेचा साक्षीदार आहे. मंडोळी गावच्या मारुती भरमा भोसले यांनी ही व्यथा मांडली आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोणत्याच सुविधा नाहीत. माझ्या मोठय़ा भावाला कोरोनाची लागण झाली. त्यांचा स्कोर 9 होता. त्यामुळे आमच्या गावातील परिचयातील डॉक्टरांना विचारले असता जिल्हा रुग्णालयात व्यवस्थित उपचार मिळतात, तेथे त्यांना दाखल करा, असे सांगण्यात आले. त्यामुळे मी जिल्हा रुग्णालयात मोठा भाऊ बाबु भरमा भोसले यांना दाखल केले. दाखल केल्यानंतर लगेच काळजी घेऊन औषध देण्यास प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे माझा भाऊ बरा होईल, अशी अपेक्षा वाढली. पण दुसऱया दिवसापासून रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱयांनी त्याची साधी विचारपूसही केली नाही.
त्यामुळे चार दिवसांनंतर माझ्या भावाची तब्येत खूपच खालावली. भावाला खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र तोपर्यंत बराचवेळ झाला होता. जिल्हा रुग्णालयातील दुर्लक्षामुळे माझ्या भावाची तब्येत खूपच खालावली. खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱयांनी जबाबदारी घेतली नाही. तरीदेखील औषधोपचार करण्यासाठी पावले उचलली. पण माझ्या भावाचा अखेर मृत्यू झाला. अशाप्रकारे कोणावरच वेळ येवू नये. तेथील डॉक्टर आणि इतर कर्मचारी कधीच रुग्णाची विचारपूस करत नाहीत. त्यामुळेच माझ्या भावाचे प्राण गेले, असा आरोपदेखील त्यांनी केला आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कोणतीच स्वच्छता नाही आणि वेळेत उपचार नाहीत. त्यामुळेच रुग्ण दगावत आहेत. मागीलवषी परिस्थिती वेगळी होती. जिल्हा रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर बरा होऊन घरी परतत होता. मात्र आता ती परिस्थिती नाही.









