अबकारी परवाना विरोधी याचिका फेटाळली
प्रतिनिधी / पणजी
केंद्रीय महिला व बालविकासमंत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबियांतर्फे आसगाव येथे चालविण्यात येत असलेल्या ‘सिली सोल्स कॅफे आणि बार’ या आस्थापनाच्या मद्य परवाना नुतनीकरणाला आव्हान देणारी याचिका अबकारी शुल्क आयुक्तांनी फेटाळून लावली आहे.
सामाजिक कार्यकर्ते ऍड. आयरीश रॉड्रिग्स यांनी सदर याचिका दाखल केली होती व गेल्या काही महिन्यांपासून त्यावर अबकारी आयुक्तांपुढे सुनावणी सुरू होती. मृत व्यक्तीच्या नावावर अबकारी परवान्याचे नुतनीकरण करण्यात आल्याचा दावा करताना याचिकादाराने सदर परवाना रद्द करण्याची मागणी केली होती.
अबकारी आयुक्तांनी सदर याचिका फेटाळून लावत सिली सोल्स ला क्लीन चीट दिल्यामुळे संतप्त बनलेल्या ऍड. रॉड्रिग्स यांनी आता उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
अबकारी आयुक्त नारायण गाड यांनी राजकीय गॉडफादरच्या दबावाला बळी पडून सिली सोल्स प्रकरणी स्मृती इराणी यांच्याबाजूने निकाल दिला असल्याचा आरोप रॉड्रिग्स यांनी केला आहे. तसेच परवाना नुतनीकरणासाठी खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली होती. त्यामुळे परवाना देताना अनेक त्रुटी राहिल्या आहेत. सदर आस्थापन असलेली जागा एटऑल फूडस् अँड ब्रिव्हरेजीस कंपनीला लीजवर देण्यात आल्याचे पुरावेही सादर करण्यात आले होते. या सर्व वस्तुस्थितीकडे आयुक्तांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, असा दावाही रॉड्रिग्स यांनी केला आहे.









