महागाईचा आगडोंब दिवसेंदिवस तीव्र : तब्बल 50 रुपयांनी सिलिंडरच्या दरात वाढ,
प्रतिनिधी / बेळगाव
‘आई जेऊ घालेना, बाप भीक मागू देईना’ या म्हणीचा प्रत्यय सध्या सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांना येत आहे. ‘अच्छे दिन’चा डांगोरा पिटला गेला तरी प्रत्यक्षात घर चालविताना गृहिणींना मात्र कोठेही अच्छे दिन दिसत नाहीत. उलट महागाईने त्यांच्या डोळय़ात पाणी आणले असून अच्छे दिन येणार कधी, असा प्रश्न त्या करत आहेत.
महागाईचा आगडोंब दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. सरकारने पेट्रोल- डिझेलची दरवाढ केलीच आहे. त्या पाठोपाठ आता सिलिंडरची दरवाढ करून सामान्य माणसाचे कंबरडेच मोडले आहे. दहा-वीस रुपये नव्हे तर तब्बल 50 रुपयांनी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्राधान्याने गृहिणींनी डोक्मयाला हात लावून घेतला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने त्याचा थेट फटका सामान्य आणि गरीब जनतेला सहन करावा लागत आहे.
1 मार्च 2020 रोजी सिलिंडरचा दर 811 रुपये होता. 1 एप्रिल रोजी तो 748 होता, 1 मे रोजी सर्वात कमी म्हणजे 587.50 रुपये होता. परंतु त्यानंतर वाढता वाढता वाढे या उक्तीनुसार 15 फेब्रुवारीला तो 778 रुपयांवर येऊन थांबला आहे. वर्षभर कोरोनामुळे संपूर्ण देशालाच आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांना तर जबर किंमत मोजावी लागत आहे. दरम्यान, आता शाळाही सुरू झाल्या आहेत. शाळेचा खर्च, परीक्षा शुल्क या सर्व खर्चांबरोबरच वीज बिलही वाढले आहे. त्यात आता पेट्रोल आणि सिलिंडरच्या दरवाढीची भर पडली आहे. त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशा परिस्थितीला सामोरे जाताना सामान्यांच्या नाकीनऊ येत आहे.
सततच्या दरवाढीने जगणे कठीण
सततच्या दरवाढीने आमचे जगणे कठीण करून ठेवले आहे. आता पुन्हा लाकूडफाटा जमा करून चूल पेटविणे बरे, अशी प्रतिक्रिया महिला व्यक्त करत आहेत. मात्र लाकूटफाटासुद्धा सहज मिळेल याची खात्री नाही. दुसरीकडे जंगलतोड झाल्याने लाकूडफाटासुद्धा पुरेशा प्रमाणात मिळणे कठीण होत आहे. दुसरीकडे शहरी भागात सर्वत्र अपार्टमेंटचे जाळे पसरले असून फ्लॅटमध्ये चूल पेटविणे शक्मय नसते.
सिलिंडरला टाळून विजेच्या शेगडय़ांचा वापर करणे अशक्मयच आहे. कारण एकतर विजेचा सतत सुरू असलेला लपंडाव आणि विजेचे वाढलेले दर. एकूणच चहू बाजुंनीच सर्वसामान्य जनता केंडीत सापडली असून सरकार आम्हाला अच्छे दिन कधी दाखविणार, असा प्रश्न विचारला जात आहे. 1 मार्च रोजी 811 रुपये हा सिलिंडरचा दर होता. त्यानंतर तब्बल 9 वेळा सिलिंडरच्या दरात बदल झाले. दरम्यान, सिलिंडरवर मिळणारी सबसिडीसुद्धा रद्द करण्यात आली आहे.
सर्वच ग्राहकांची सबसिडी रद्द
सरकारने उज्ज्वला योजना जाहीर केली आणि ग्रामीण भागापर्यंत सिलिंडर पोहोचल्याने गृहिणींची सोय होईल, असे जाहीर केले. यासाठी त्यांना मदत म्हणून उच्चभ्रू वर्गाने सिलिंडरवरील सबसिडी सोडावी असे आवाहनही केले. ज्यांनी ही सबसिडी सोडली त्यांना सरकारकडून पत्रही आले. मात्र, आता सर्वच ग्राहकांची सबसिडी रद्द करण्यात आली आहे. परिणामी 778 रुपये आणि डिलिव्हरी बॉयला दिले जाणारे 20 रुपये (ऐच्छिक) यामुळे एकूण 800 रुपये मोजावे लागणार आहेत.
सिलिंडर दरवाढीच तीव्र निषेध
सरकारने केलेल्या सिलिंडर दरवाढीचा राष्ट्रीय महिला फेडरेशनच्या राज्य शाखेने तीव्र निषेध केला आहे. कोरोनामुळे आधीच आर्थिक अडचणीत आलेल्या सामान्य व गरीब जनतेला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे. अशा वेळी पेट्रोल, डिझेल, वीज दरवाढ झाल्यानंतर सिलिंडरच्या दरवाढीने महागाईच्या झळांमुळे जनता होरपळून निघत आहे. मागील काही दिवसात सिलिंडरच्या किमतीत 175 रुपयांची वाढ झाली आहे. जीवनावश्यक दर वाढले आहेत. हे चित्र असेच राहिल्यास लोकांना उपाशी राहण्याची वेळ येणार आहे. सरकारने ही वेळ येण्यापूर्वी त्वरित जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावेत. त्याचसोबत सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
– प्रमोदा हजारे (राज्य सचिव-राष्ट्रीय महिला फेडरेशन)
| वर्षभरात बदलले सिलिंडर दर | |
| महिना | दर रुपये |
| 1 मार्च 2020 | 811 |
| 1 एप्रिल 2020 | 748 |
| 1 मे 2020 | 587.5 |
| 1 जून 2020 | 599 |
| 1 जुलै 2020 | 603 |
| 1 डिसेंबर 2020 | 653 |
| 15 डिसेंबर 2020 | 703 |
| 4 फेब्रुवारी 2021 | 728 |
| 15 फेब्रुवारी 2021 | 778 |









