प्रतिनिधी/ म्हापसा
मोरडावाडी कांदोळी येथे शनिवारी सकाळी स्वयंपाक घरातील सिलिंडरचा स्फोट होऊन समुद्रकिनाऱयावरील दोन शॅक पूर्णतः जळून खाक झाले. या आगीत दोन्ही शॅकची मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
आगीत शॅकवरील सर्व सामान ऍमप्लिफायर, म्युझीक सिस्टम, फर्निचर, भांडी, उपकरणे आदी सर्व सामान पूर्णतः जळून खाक झाले. घटनेची माहिती पीळर्ण अग्निशमन दलाला दिल्यावर दलाचे अधिकारी रुपेश सावंत यांनी आपल्या पथकांसमवेत घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शॅकस्थानी जाण्यास रस्ता नसल्याने बंब 200 मीटरच्या लांब ठेवावे लागले. त्यामुळे आग विझवण्यास दलाच्या अधिकाऱयांना बराच त्रास सहन करावा लागला. अग्निशमन बंब आल्यावर तेथे वाटेवर बॅरेकेट घालम्यात आले होते ते बाजूला करून दलाच्या जवानांनी त्वरित बंबला पाण्याचे पाईप लावून घटनास्थळी धाव घेतली व आग विझविली. मात्र बंब येईपर्यंत सर्व सामान जळून खाक झाले होते. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. मात्र या ठिकाणी वीजेचे खांबे असल्याने तेथे स्पार्क होऊन शॉटसर्कीटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. दुपारच्यावेळी आग लागल्याने समुद्राच्या वाऱयामुळे ही आग भडकली व आगीने मोठा पेट घेतला असता कामिलो सांताना आकांजो फर्नांडिस यांच्या मालकीचे कामरोस शॅक, तर मोरडावाडा कांदोळी येथील प्रियंका बागकर यांच्या मालकीचे सी रॉक शॅक पूर्णतः जळून खाक झाले. कामरोस शॅकमधील स्वयंपाक घरातील एक सिलिंडर ब्लास्ट झाल्याने आग बाजूच्या शॅकात गेली असता तेही शॅक पूर्णतः जळून खाक झाले. आजूबाजूच्या लोकांनी समुद्रातील पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने मोठा भडका घेतल्याने आग नियंत्रणात आणणे मुश्कील झाले त्यात स्फोट झाल्याने सर्वांनी तेथून पळ काढला. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र या आगीत दोन्ही शॅक मालकांचे बरेच नुकसान झाले.
वीज वायर्सवर आलकॉलीन पाईप बसविणे गरजेचे
शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष मान्युअल कार्दोज यांनी घटनास्थळी धाव घेऊन शॅक स्थानकाची पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, यापूर्वी अशीच दुर्घटना म्हाडोवाडा कळंगूट येथे झाली होती. सरकारने आम्हाला वीज घालू नदिली मात्र त्याचे प्रिकॉर्शन घेतले नाही. येथे वायर्स घातल्या आहेत त्यावर आलकॉलीन पाईप बसविले नाही. कावळे बसल्याने दोन वायर्स एकत्र येऊन शॉर्टसर्कीट होते. स्ट्रीट लाईट घालून ठेवले मात्र त्यावर वीज नाही. येथे दोन शॅकना आग लागली मात्र अग्निशमन दलाने येथे त्वरित धाव घेऊन आग विझविली. सरकार मात्र शॅक मालकांना काहीच सोयी सुविधा देत नाही असा आरोप त्यांनी केला.
पीळर्णचे अधिकारी रुपेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रामा नाईक, साईश च्यारी, श्रीकांत सावंत, जितेंद्र बली, पर्वरीचे संदीप नाईक, विदेश म्हापसेकर, स्वप्नील नाईक, महेश माजिक, म्हापशाचे सुरज शेटगावकर, स्वप्नेश कळंगुटकर, संजय फडते, सलील बाणावलीकर यांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला.









