नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दीर्घ दौऱयावर जाणार असून त्यासाठी संघाची निवड याच आठवडय़ात होणार आहे. यातील कसोटी संघातील पाचव्या वेगवान गोलंदाजाच्या स्थानासाठी मुंबईचा शार्दुल ठाकुर व हैदराबादचा मोहम्मद सिराज यांच्यात चुरस लागणार आहे. याशिवाय गुजरातचा डावखुरा स्पिनर अक्षर पटेललाही या दौऱयात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
या दौऱयात टी-20 व वनडे अशा दोन मालिका व चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या तिन्ही प्रकारासाठी सुनील जोशींच्या अध्यक्षतेखालील निवड समिती या किंवा पुढील आठवडय़ात जंबो संघ निवडण्याची अपेक्षा आहे. शमी, बुमराह, उमेश यादव यांची स्थाने निश्चित आहेत. पण भुवनेश्वर कुमार (मांडीची दुखापत) व इशांत शर्मा (स्नायुदुखी) हे वेगवान गोलंदाज फिट नसल्याने चौथा वेगवान गोलंदाज म्हणून नवदीप सैनीची निवड निश्चित मानली जात आहे. कसोटीसाठी पाचवा वेगवान गोलंदाज म्हणून सिराजला निवडले जाईल, अशी जास्त शक्यता वाटते.
कारण भारत अ व रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केलेली आहे. त्याच्या आधारे त्याची संघात वर्णी लागू शकते. नवा चेंडू स्विंग करण्याची क्षमता असणारा शार्दुल ठाकुर याचाही या जागेसाठी विचार होऊ शकतो. विंडीज दौऱयात ठाकुरला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली होती. पण पहिल्याच षटकात गोलंदाजी करताना त्याची धोंडशिर दुखावल्याने तो पुढे गोलंदाजी करू शकला नव्हता.
‘सिराजने भारत अ साठी गेल्या काही मोसमात अप्रतिम कामगिरी केली असून तो सरस गोलंदाज असल्याचे मला वाटते. याशिवाय ऑस्ट्रेलियातील वातावरणात तो जास्त उपयुक्त ठरू शकतो,’ असे निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी मंगळवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. नवीन निवड समिती शिवम मावीचा सर्व फॉरमॅटचा गोलंदाज म्हणून विचार करू शकते, असे प्रसाद यांना वाटते. त्याला मर्यादित षटकांच्या सामन्यात जास्त संधी दिली जाईल. पण नंतर कसोटीसाठी त्याला तयार केले जाईल, असे ते म्हणतात. मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी शार्दुल ठाकुर व सीएसकेचा त्याचा सहकारी दीपक चहर यांची निवड निश्चित आहे. मात्र उमेश यादवला या संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. यष्टिरक्षकांचा विचार केल्यास संघात एकूण चार विकेटकीपर्स असतील. मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी केएल राहुल ही पहिली पसंती असेल तर रिषभ पंत (सर्व फॉरमॅटसाठी) व संजू सॅमसन (फक्त टी-20 साठी) हेही या जंबो संघात असतील. वृद्धिमान साहाला कसोटीसाठी पुन्हा एकदा पंतचा पर्याय म्हणून संघात स्थान मिळणार आहे. सलामीसाठी रोहित शर्मा, मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल सर्व फॉरमॅटसाठी उपलब्ध असतील. याशिवाय केएल राहुल व शिखर धवन यांचे मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी सलामीचे स्थान निश्चित असल्याने नव्या चेंडूला सामोरे जाणारे एकूण सहा फलंदाज या संघात असतील.
सर्व प्रकारासाठी निवडले जाणारे संभाव्य खेळाडू : कोहली, रोहित शर्मा, रहाणे, पुजारा, हनुमा विहारी, केएल राहुल, धवन, पृथ्वी शॉ, अगरवाल, शुभमन गिल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, हार्दिक पंडय़ा, रिषभ पंत, सॅमसन, साहा, जडेजा, आर.अश्विन, यजुवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, बुमराह, शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज.









