10 लाख वाहनांची निर्मिती : 2022 च्या प्रारंभी पहिला कारखाना अस्तित्वात
वृत्तसंस्था/ बेंगळूर
जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक दुचाकी निर्मितीचा कारखाना स्थापन करण्याचा विचार सिम्पल एनर्जी यांनी नुकताच केला आहे. यासंदर्भातील योजना कंपनीने आखली असल्याची माहिती आहे.
कंपनीचा पहिला कारखाना हा 10 लाख इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती क्षमतेचा असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. 2022 मध्ये या कारखान्याचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ‘सिम्पल वन’ इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती केली जाणार आहे.
एक स्टार्टअप कंपनी
सिम्पल एनर्जी ही बेंगळूरमधली इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनी आहे, जिने तामिळनाडू सरकारबरोबर सहकार्याचा करार केला असून याअंतर्गत 2500 कोटी रुपये गुंतवणूक होणार असल्याचे समजते. या अंतर्गत सर्वाधिक इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करण्याचे ध्येय कंपनीने समोर ठेवले आहे.
पहिला कारखाना
पहिला कंपनीचा कारखाना हा दोन लाख चौरस फुटाच्या जागेत होसुरजवळ साकारला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या वषी अर्थातच 2022 च्या सुरुवातीसच कारखान्यामध्ये उत्पादनाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दुसराही कारखाना उभारणार
सिम्पल एनर्जीचे संस्थापक व सीईओ सुहास राजकुमार यांनी सांगितले की, तामिळनाडू सरकारने आमच्यातला आत्मविश्वास अधिक वाढवला असून आम्हाला वाहन उत्पादनक्षमता वाढवणे शक्य होणार आहे. तामिळनाडू सरकार बरोबरचा सहकार्याचा करार भारतातील सर्वाधिक इलेक्ट्रिक दुचाकी निर्मितीच्या कार्यामध्ये आघाडी घेण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दुसऱया टप्प्यामध्ये सहाशे एकरच्या क्षेत्रफळावर दुसरा कारखाना उभारण्याचा विचारही कंपनीने केला आहे.









