50 टक्के क्षमतेने खुली होणार
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील सिनेमा थिएटर्स, मल्टीप्लेक्स येत्या 15 ऑक्टोबरपासून 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत खुली करण्यात येणार असून ती खुली झाली तरी प्रेक्षक येतील की नाही ? हा मोठा प्रश्न थिएटर्स मालकांना पडला आहे. सध्या तरी तेथे दाखवण्यासाठी चित्रपटच नसल्यामुळे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती झाली आहे.
अखिल गोवा थिएटर्स मालक संघटनेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-महाराष्ट्र आणि दिल्ली येथील सिनेमा थिएटर्स सध्या बंदच आहेत. ती सुरू झाल्याशिवाय गोव्याला चित्रपट मिळणे कठीण असून ते जरी आले तरी त्याचे प्रदर्शन करणे थिएटर्स मालकांना परवडणारे नाही आणि चित्रपट दाखवण्याचे धाडसही कोणी करणार नाही, असे सुत्रांनी नमुद केले.
राज्यात स्थानिक चित्रपटांचा अभाव
देशभरात तसेच गोव्यातही कोरोनाचे संकट कायम असून अशा वेळी प्रेक्षक थिएटर्समध्ये येणे शक्य नाही. केंद्र सरकारने जारी केलेल्या अनलॉक 5.0 च्या मार्गदर्शक तत्वानुसार 15 ऑक्टोबरपासून 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सिनेमा थिएटर्स सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व राज्यातील थिएटर्स सुरू होतील. त्या त्या राज्यात स्थानिक चित्रपट मोठय़ा संख्येने असतात आणि ते मिळतात परंतु गोव्यात मात्र परिस्थिती वेगळी आहे. स्थानिक चित्रपट फारसे नाहीत आणि जे आहेत ते यापूर्वी प्रदर्शित झालेले आहेत. हिंदी, इंग्रजी चित्रपट सध्या नाहीत आणि ते दाखवणे परवडण्यासारखे नाही, अशी माहिती संघटनेच्या सुत्रांनी दिली.
प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह
गोव्यात गेल्या सात ते आठ महिन्यांपासून थिएटर्स बंदच आहेत आणि केंद्र सरकारने जरी ती सुरू करण्यास मान्यता दिली असली तरी ती सुरू करणे कोरोनामुळे धोकादायक आहे. 50 टक्के उपस्थिती निश्चित केली असली तरी 25 टक्के तरी प्रेक्षक मिळतील की नाही याची शाश्वती नाही. मुंबई, दिल्ली येथील सिनेमा थिएटर्स सुरू झाल्यानंतरच गोव्यातील थिएटर्स सुरू करणे शक्य होणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.









