एकी दाखविण्याचा प्रयत्न – पंजाब काँग्रेसमधील कलहाची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था/ केदारनाथ
पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या कलहादरम्यान मुख्यमंत्री चरणजीत चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी उत्तराखंडमध्ये भगवान केदारनाथाचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर त्यांनी एकजुटता दाखविणारी छायाचित्रे प्रसारित केली आहेत. ही छायाचित्रे पाहून विरोधकच नव्हे तर त्यांच्या पक्षातील नेत्यांनीही शरसंधान केले आहे. लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू यांनी उत्तराखंडमध्ये एकजूट आहात मग पंजाबमध्ये का नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. पंजाबमध्ये सध्या सिद्धू यांनी स्वतःच्या सरकारविरोधातच आघाडी उघडली आहे.
तत्पूर्वी देहरादून येथे पोहोचून सिद्धू आणि मुख्यमंत्री चन्नी यांनी हरिश रावत यांची भेट घेतली. सिद्धू आणि चन्नी यांच्यातील ही एकजुटता पंजाबमध्ये आल्यावर कायम राहते की नाही हे भविष्यात सिद्धू यांच्या मागण्यांवर सरकारची कारवाई आणि त्यांच्या विधानाने स्पष्ट होणार आहे.
पंजाबमध्ये ऑल इज वेल
पंजाब काँग्रेसचे माजी प्रभारी हरिश रावत यांनी पंजाबमध्ये आता ऑल इज वेल असल्याचा दावा केला आहे. पंजाब काँगेसमध्ये हीच स्थिती कायम राहणार असल्याचा विश्वास आहे. पंजाबच्या निवडणुकीत आम्ही अवश्य जिंकू. सिद्धू आणि मुख्यमंत्री चन्नी यांना एकत्र पूर्ण देश पाहत असल्याचे रावत यांनी म्हटले आहे.
मंत्र्याच्या घरी तडजोड
तत्पूर्वी सोमवारी रात्री उशिरा राज्याचे मंत्री परगट सिंह यांच्या घरी महत्त्वाची बैठक झाली. यात पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरिश चौधरी आणि नवज्योत सिंह सिद्धू सामील झाले. परगट सिंह हे सिद्धू यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या निवासस्थानीच मुख्यमंत्री चन्नी आणि सिद्धू यांच्या भेटीची योजना तयार झाली, ज्यानंतर केदारनाथ यात्रेचा पर्याय निवडण्यात आला.
अंतर्गत कलह सुरू
पंजाब काँग्रेसमधील कलह संपुष्टात आणणे पक्षशेष्ठींना अवघड ठरू लागले आहे. प्रथम सुनील जाखड यांना हटवून सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांना हटवून चरणजीत चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यानंतर पंजाब काँग्रेस प्रभारी हरिश रावत यांना हटवून हरिश चौधरी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. तरीही सिद्धू आणि सरकारमधील संघर्ष सुरूच आहे.
केदारनाथाने सद्बुद्धी द्यावी!
मुख्यमंत्री चन्नी आणि सिद्धू यांच्या केदारनाथ यात्रेवर शिरोमणी अकाली दलाने उपरोधिक टीका केली आहे. केदारनाथाने त्यांना सद्बुद्धी द्यावी, जेणेकरून ते पंजाबचा सत्यानाश करणार नाहीत. पंजाबमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार केला जातोय. सिद्धू अडीच वर्षे मंत्री राहिले. चरणजीत चन्नी देखील पूर्वी मंत्री आणि आता मुख्यमंत्री आहेत, मग पूर्वी कामे का झाली नाहीत. पंजाबमध्ये मूर्ख करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे अकाली दलाचे प्रवक्ते डॉ. दलजीत चीमा यांनी म्हटले आहे.