●सातारा पालिका कर्मचारी वर्गातून संताप ●शिवशाही भिंतीच्या कामावरून ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांस फैलाव घेताना जीभ घसरली
सातारा / प्रतिनिधी :
प्रभागातील शिवशाही अपार्टमेंटच्या भिंतीच्या कामावरून बांधकाम सभापती, भाजप नगरसेविका सिद्धी पवार यांनी फोनवरून ठेकेदाराच्या कामगारास चांगले फैलावर घेतले. त्यावेळी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप गेल्या तीन दिवसांपासून चांगलीच व्हायरल झाली आहे. दरम्यान, या प्रकाराबद्दल सातारा नगरपालिका कर्मचारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. या प्रकारावरून सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा पालिकेत प्रथमच खासदार उदयनराजे यांनी भाजपच्या महिला नगरसेविका म्हणून सिद्धी पवार यांना बांधकाम सभापती म्हणून संधी दिली आहे. त्यांच्या कार्यपध्दती सुरुवातीपासून सडेतोड अशीच असल्याचे सातारकरांना अनुभव आला. नुकतीच चार दिवसापूर्वी घडलेल्या घटनेचा ऑडिओ क्लिप शुक्रवारी पालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर पहायला मिळत होती. त्यामध्ये मुख्याधिकारी अभिजित बापट यांना शिवीगाळ केल्याचा उल्लेख असल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालिका कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी सवांद साधून माहिती घेत घडल्या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे.









