वार्ताहर / गोकुळ शिरगाव
श्री सिद्धगिरी कृषि विज्ञान केंद्र कणेरीमठ आणि इफको यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी महिला व अंगणवाडी कार्यकर्त्यांसाठी निरोगी संतुलित आहार, पोषण समृद्ध भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, सेंद्रिय भाजीपाला व फळबाग लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये एकूण १३५ शेतकरी महिला व अंगणवाडी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
महिलांचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत चालले आहे. रक्तक्षय आणि कॅल्शिमची कमतरता महिलामध्ये जास्त आहे. त्यामुळे महिलांनी सांधेदुखी, चरबी वाढणे, निद्रानाश, केस पांढरे होणे आदी आजार उद्भवतात. या समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येक महिलेने आपल्या परड्यामध्ये परसबागेचे नियोजन करावे त्यातून जास्तीजास्त सेंद्रिय भाज्या त्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कंदवर्गीय भाज्या आणि शेंगवर्गीय अश्या सर्व भाज्या घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला संतुलित आहार मिळेल आणि आपल्याला निरोगी राहण्यास मदत होईल. निरोगी आरोग्यासाठी सेंद्रिय भाजीपाल्या सोबतच सात्विक विचार, व्यायाम, आणि आरामहि अतिशय महत्वाचे आहे. या सर्व गोष्टीची काळजी घेतल्यास आपण नक्कीच निरोगी राहू असे आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. सुनंदा खुराडे प्रकल्प संचालक आत्मा, कोल्हापुर यांनी सांगितले.
त्यानंतर इफकोच्या माध्यमातुन परसबागेसाठी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. परसबागेतील भाज्याचे महत्व व त्यातील पोषक तत्वे यावर श्री. विजय बुनगेकर प्रक्षेत्र अधिकारी इफ्को, कोल्हापुर यांनी सांगितले.
प्रयोगशील सेंद्रिय शेतकरी व सिद्धगिरी मठाचे शेती अधिकारी श्री तानाजी निकम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सेंद्रिय पद्धतीने बंपर उत्पादन घेणेसाठीच्या महत्वाच्या टिप्स दिल्या. यामध्ये प्रामुख्याने घराच्या-घरी सेंद्रिय नत्र-स्फुरद-पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, ग्रोथप्रमोटर, कीटकनाशक जीवामृत, बिजामृत, गोकृपाअमृत घरच्या-घरी कसे तयार करायचे त्याचा वापर वेगवेगळ्या पिकांत कश्याप्रकारे व कधी करावयाचा याबाबत विवेचन केले. घरचे बियाणे व घरची खते निर्मितीमुळे निश्चितच उत्पादन खर्च अत्यल्पप्रमाणात होईल व पर्यावरणपूरक शेतीतून सकस अन्नधान्य, भाजीपाला निर्मिती करून परिवाराचे आरोग्य, जमिनीचे आरोग्य उत्तमप्रकारे जपता येईल हे अनेक उदाहरणासह समजावून सांगितले.
पोषण बागेसाठी सुरवातीस गरजूंना सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र मार्फत मोफत बियाणे पुरविण्याचे वचनही त्यांनी दिले. याशिवाय अनेक महिलांच्या सेंद्रिय शेती विषयक शंका व प्रश्नांना अत्यंत सुलभ व सोप्या भाषेत उत्तरे दिली. परसबागेसाठी जागेची निवड घराच्या परसदारी असलेल्या अंगणात करावी. जमिनीची तयारी कुदळीने खोदून शेणखत व गांडूळखताचा वापर करावा. सर्वात महत्वाचे म्हणजे सांडपाण्याची विल्हेवाट लागती आणि ताजी भाजी खायला मिळते, पैश्याची बचतही होते आणि त्याचं बरोबर आपले आरोग्य सुधारते असे मार्गदर्शन प्रगतशील महिला शेतकरी रुपाली माळी यांनी केले.
आहारामध्ये कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्वे, खनिजे आणि पाणी असणे अतिशय महत्वाचे आहे. हि सर्व पोषक तत्वे आपल्याला तृणधान्य, कडधान्य, तेलबिया आणि भाज्यांपासून मिळतात तर भाज्यामध्ये पालक, मेथी, कोथिंबीर, अंबाडी, शेपू, शेवगा, तांदूळासा ह्या पालेभाज्या, दुधी भोपळा, कारले, टोमॅटो, भेंडी, वांगी या फळभाज्या आणि सर्व कंदवर्गीय भाज्या मुळा, रताळी, बटाटे, गाजर आणि मोसमी फळे आहारात असायला हवे. संतुलित आहार म्हणजे ज्यामध्ये अन्नपदार्थांचा योग्यत्या प्रमाणात व परिमाणात समावेश केला जातो. हा आहार व्यक्तीच्या वय, लिंग, कामाचे स्वरूप आणि शारीरिक अवस्था यावर अवलंबून असतो. म्हणून आहारामध्ये असर्व अन्नघटक असणे अत्यंत महत्वाचे आहे असे मार्गदर्शन गृहविज्ञान शास्त्रज्ञा प्रतिभा ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन राजेंद्र वावरे मृदा शास्त्रज्ञ यांनी केले आणि आभार प्रदर्शन. पांडुरंग काळे कृषि विद्या शास्त्रज्ञ यांनी केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









